इस्लामाबाद - पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने शिवसेनेला राक्षस संबोधले आहे. केंद्र सरकारला त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा सल्लाही दिला आहे. 'द न्यूज इंटरनॅशनल' वृत्तपत्राने 'शिवसेना मॅडनेस' या शीर्षकाच्या संपादकीयमध्ये नमूद केले की, शिवसेनेची दहशत नियंत्रणाबाहेर जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अशा घटना घडत आहेत. या पक्षाने भूतकाळातही हे प्रकार केले आहेत. मात्र, त्यांनी बळ आणि इतका द्वेष कधी दाखवला नव्हता.
शिवसेना सत्तारुढ रालोआतील भाजपचा सहकारी पक्ष आहे. यामुळे भारत सरकारही शांत आहे. शिवसेनेने सोमवारी बीसीसीआयमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध पुनर्स्थापनेच्या बैठकीदरम्यान गोंधळ घातला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सध्या क्रिकेट मालिका सुरू आहे. त्यात पाकिस्तानी पंच अलीम डार यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीवरही शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्याआधी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री कसूरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मुंबईमध्ये सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले होते, असे उल्लेख यात आहेत.