आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकची अर्थव्यवस्था हळूहळू रुळांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - सुरक्षा यंत्रणेने दहशतवादी संघटनांना सळो की पळो करून सोडल्यामुळे गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीच हा दावा केला अाहे. त्याचबरोबर देशाचा आर्थिक गाडा रुळांवर येत असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी जागतिक बँकेला दिली आहे.
देशात गेल्या १३ वर्षांत पहिल्यांदाच महागाई निर्देशांकाने नीचांकी पातळी गाठल्याचा हवाला शरीफ यांनी दिला. परकीय गंगाजळीचा पुरेसा साठा आणि वित्तीय तूट कमी असल्याचा दावाही शरीफ यांनी केला आहे. जागतिक बँकेचे शिष्टमंडळ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाशी शरीफ यांनी चर्चा केली. त्या वेळी शरीफ यांनी देशाची आर्थिक घडी पुन्हा बसू लागली आहे, असे नमूद केले आहे. उपाध्यक्षा अॅनेट डिक्सोन यांच्यासोबत शरीफ यांची चर्चा झाली.
कडक भूमिका

सरकारने दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली. त्याचबरोबर अनेक महिन्यांपासून दहशतवादी तळांवर हल्ले सुरू आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांच्या कारवायांना धक्का बसला आहे. त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाले आहे.
डिक्सॉन यांच्याकडून अभिनंदन

जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डिक्सॉन यांनी आर्थिक प्रगतीच्या दिशेने पाऊल पडल्याबद्दल पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या क्षमता आहेत. विशेषत: कृषी आणि दुग्ध क्षेत्रात पाकिस्तानला चांगले भवितव्य असल्याचे डिक्सॉन म्हणाल्या.
विजेवरही तोडगा

पाकिस्तानात वीज तुटवड्याची समस्या तीव्र स्वरूपात पाहायला मिळते; परंतु शरीफ सरकारने २०१८ पर्यंत १० हजार मेगावॅट विजेचा प्रकल्प सुरू करून देशाला प्रकाशमान करण्याचा संकल्प केला आहे. नॅशनल ग्रीडला त्यामुळे चालना मिळू शकेल. देशातील विजेची समस्या सुटण्यासही काही प्रमाणात त्याचा उपयोग होईल, असा सरकारला विश्वास वाटतो.