आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर बाजवा पाकचे नवे लष्करप्रमुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद : अखेर जनरल कामर जावेद बाजवा यांची पाकिस्तानचे नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ही घोषणा केली. मावळते लष्करप्रमुख राहिल शरीफ यांच्या पसंतीला नाकारत शरीफ यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवली.
बाजवा बलुचिस्तान रेजिमेंटशी संबंधित आहेत. सध्या त्यांच्याकडे मुख्यालयात प्रशिक्षण विभागाचे महासंचालकपद होते. राहिल शरीफ यांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर बाजवा पाकिस्तानचे १६ वे लष्करप्रमुख म्हणून पद स्वीकारतील. १० कॉर्प्सचे बाजवा यांची कारकीर्द पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गेली आहे. त्यांच्या रेजिमेंटनेच काश्मिरमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन दिले .
राहिल शरीफ यांनी मात्र या पदासाठी लेफ्टनंट जनरल इश्फाक नदीम अहमद यांच्या नावाची शिफारस केली होती. ती नाकारण्यात आली. त्यामुळे राहिल नाराज असल्याचे उघडच आहे. पाकिस्तानात लष्करप्रमुखाची नियुक्ती लोकनियुक्त नेत्यांकडून केली जाते. परंतु सरकारच्या निर्णय प्रक्रियेत लष्कराची मोठी भूमिका असते. १९९९ मध्ये शरीफ यांना सत्ता सोडावी लागली होती. आयएसआय प्रमुख झियाउद्दीन बट व जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या संगनमतामुळे शरीफ यांना पद सोडावे लागले होते. हीच देशाची अनेक वर्षांची परंपरा आहे.

शरीफ-घनी भेट, द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शनिवारी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. प्रदेशात शांतता नांदावी म्हणून पाकिस्तानचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दहशतवादाच्या उच्चाटनासाठी एकत्र येऊन लढा देण्याची तयारी उभय नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
ग्वाडेर बंदराचा फायदा रशियालाही
पाकिस्तानने रशियाला ग्वाडेर बंदराचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. रशियाने याबाबतची विनंती केली होती. याबरोबरच पाकिस्तान-रशिया यांच्यात नवीन संबंधाला सुरुवात झाली आहे. शीतयुद्धाच्या दरम्यान रशिया व पाकिस्तान यांच्यात शत्रुत्व होते. ग्वाडेर बंदर बलुचिस्तानात आहे. त्याचा विकास चीन करत आहे. पाकिस्तानच्या ग्वाडेर बंदराचा वापर करण्यासाठी इराण, तुर्कमेनिस्तान व रशियाने परवानगी मागितली होती. पाकिस्तानने रशियाला त्यासंबंधीची परवानगी दिली आहे. रशिया पाकिस्तानसोबतचे सामरिक संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. भारत अमेरिकेकडे अधिक झुकल्याने रशियाने हा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...