आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak’s Deal With The United States For The Procurement Of 8 F 16 Fighter Jets

भारताच्या आडकाठीनंतरही अमेरिका पाकला आठ एफ-16 विमाने देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - अमेरिका पाकिस्तानला आठ एफ-१६ विमाने देण्यास बांधील असून भारताने यात कितीही आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तरी विमाने मिळतील, अशी माहिती पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मंगळवारी दिली.

आसिफ म्हणाले, भारत आणि पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी या लढाऊ विमानाच्या पुरवठ्यात आडकाठी आणली असली तरी बराक ओबामा प्रशासन एफ-१६ लढाऊ विमाने देण्यास बांधील आहे. रिपब्लिकनचे वर्चस्व असलेल्या अमेरिकी काँग्रेसने एफ-१६ विमानांचा पुरवठा रोखल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या. विशेषत: भारतीय हद्दीत पठाणकोटमधील हवाईतळावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना मिळत असलेल्या आश्रयाच्या मुद्द्यावरून पाकला होणाऱ्या लढाऊ विमानांचा पुरवठा अडचणीत आला होता. पाकिस्तान जोवर आपल्या हद्दीत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करत नाही तोवर संरक्षण साहित्याच्या खरेदीबाबत अमेरिकेने विचार करू नये, असे अमेरिकी काँग्रेसचे मत होते. दरम्यान, या मुद्द्यावरून पाकिस्तानी संसदेत झालेल्या चर्चेत अमेरिकेवर प्रखर टीका करण्यात आली होती.

हवाई संरक्षण क्षमतेचा कणा : या विमानाचा दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईतही वापर केला जातो. ओबामा प्रशासनाने ऑक्टोबरमध्ये पाकला एफ-१६ विमाने देत असल्याचे सांगितले हेाते. अतिरेक्यांविरुद्धच्या लढ्यात पाकिस्तान योग्य भूमिका बजावत नसल्यामुळे अमेरिका आणि पाकच्या संबंधांत तणावामुळे हा व्यवहार रद्द होण्याची शक्यता आहे.
हक्कानींवर खापर
आसिफ अली झरदारी यांच्या राष्ट्रपतिपदाच्या काळात हक्कानी अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत होते. याच काळात भारताने एफ-१६ जातीच्या विमानांचा पाकला करण्यात येणाऱ्या पुरवठा व्यवहारात आडकाठी आणली. याला हक्कानी यांनीही फूस दिली, असे गंभीर आरोप आसिफ यांनी केले. मात्र, यात हक्कानी यांची नेमकी भूमिका ते स्पष्ट करू शकले नाहीत. हक्कानी यांनी पाक लष्कराविरुद्ध अमेरिकी सरकारला टिप्पणी लिहिली होती. यानंतर हक्कानींना बडतर्फ करण्यात आले.