इस्लामाबाद- पनामा खटल्यातील हायप्रोफाइल नवाझ शरीफ यांच्याविरोधातील सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू होती, परंतु न्यायालयाने याबाबतचा निकाल मात्र तूर्त राखून ठेवला आहे.
तीनसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायमूर्ती एजाज अफजल व न्यायमूर्ती शेख अजमत सईद, एजाझुल अहसान यांच्या पीठाने मात्र निकाल जाहीर केला नाही. निकाल एवढ्यात देता येणार नाही. याचिकाकर्ता आणि बचाव पक्षाच्या मूलभूत हक्कांची आम्हाला जाणीव आहे, असे पीठाने म्हटले. संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) सादर केलेल्या १० कलमी अहवालाच्या अंतिम भागाबाबतही सर्वोच्च न्यायालयाने खटल्याची सुनावणी सुरू केली आहे. शरीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप आहे. त्याच्या चौकशीसाठी संयुक्त तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
अहवाल गोपनीय, जाहीर न करण्याचे आदेश : जेआयटीने सादर केलेल्या अहवालातील माहिती गोपनीय स्वरूपाची आहे. त्याला जाहीर केले जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बजावले आहे. या अहवालाची एक प्रत शरीफ यांचे वकील ख्वाजा हारिस यांना देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात नवाज शरीफ यांच्याविरोधातील पनामा खटल्याचा फटका त्यांच्या राजकीय कारकिर्दीला बसू शकतो. म्हणूनच सर्वाेच्च न्यायालयातील निकालावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
लंडनमधील संपत्तीचा वाद
शरीफ यांची मुले हसन व हुसेन मुलगी मरयम यांच्या नावावर लंडनच्या पार्क लेनमध्ये अत्यंत महागडे फ्लॅट्स आहेत. पनामा गेटमध्ये त्याबाबतचा गौप्यस्फोट करण्यात आला. त्यानंतर लंडनमधील संपत्ती वादाच्या केंद्रस्थानी राहिली. पार्क लेनमध्ये एकूण चार फ्लॅट शरीफ कुटुंबीयांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात येते.
समाधानकारक उत्तरे नव्हती : तेहरिक
पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्यावरील आरोपावर बाजू मांडताना दिलेली उत्तरे समाधानकारक नव्हती. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार राहत नाही. त्यामुळे त्यांना अपात्र म्हणून जाहीर केले पाहिजे, असा दावा तेहरिक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्या वकिलांनी केला.