आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाझ शरीफ पाकिस्तानमध्ये जपत आहेत नरेंद्र मोदींचे हित; इम्रान खानचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इमरान खान अध्यक्ष असलेल्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने आंदोलनाची तयारी केली आहे. - Divya Marathi
इमरान खान अध्यक्ष असलेल्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने आंदोलनाची तयारी केली आहे.
इस्लामाबाद- पंतप्रधान नवाझ शरीफ हे पाकिस्तानमध्ये भारतातील त्यांचे समकक्ष नरेंद्र मोदी यांच्या हिताची जपणूक करत आहेत, असा आरोप पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी रविवारी केला.

आपल्या निवासस्थानाबाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत इम्रान खान म्हणाले की, नवाझ शरीफ जेव्हा लंडनमध्ये कुठल्या तरी शस्त्रक्रियेसाठी गेले होते, तेव्हा त्यांनी रुग्णालयातील बेडवरून त्यांनी आई किंवा मुलांऐवजी सर्वात आधी मोदी यांना फोन केला. शरीफ हे मोदींचे पाकिस्तानातील ‘हित’ जपत आहेत. सुरक्षेशी संबंधित माहिती लिक होण्यामागे नवाझ शरीफ हेच आहेत. त्यामुळे सशस्त्र दलांची चांगलीच बदनामी झाली. खरे सांगायचे तर मोदी आणि शरीफ यांचा अजेंडा एकच आहे. माहिती लिक केल्याच्या आरोपावरून माहितीमंत्री परवेज रशीद यांना बडतर्फ करण्यात आले आहे, पण ते स्वत: अशी माहिती माध्यमांकडे लिक करू शकत नाहीत, हे प्रत्येकाला माहीत आहे. रशीद हे ‘दरबारी’ आहेत. नवाझ यांनी त्यांना जे सांगितले तेच त्यांनी केले. एका भ्रष्ट पंतप्रधानाला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणेचा वापर केला जात आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शरीफ यांचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. परवेझ मुशर्रफ यांची हुकूमशाही आणि शरीफ यांची लोकशाही यात काहीही फरक नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

पनामा पेपर्स लिक प्रकरणात शरीफ यांचे नाव आल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याच्या दबावासाठी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने नोव्हेंबरला इस्लामाबाद बंदची घोषणा केली आहे. सरकारने याआधीच राजधानीकडे येणाऱ्या रस्त्यांची नाकेबंदी केली असून हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस आणि पीटीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये इस्लामाबाद तसेच पंजाब प्रांताच्या काही भागांत चकमकी उडाल्या आहेत.

मंत्र्याच्या कारमध्ये आढळली शस्त्रास्त्रे
खैबर पख्तुनख्वा प्रांताचे महसूलमंत्री आणि पीटीआयचे नेते अमीन गंदापूर यांची कार नाक्यावर थांबवण्यात आली. कारमध्ये पाच कलाइश्निकोव्ह रायफली, एक पिस्तूल, सहा मॅगझिन, एक बुलेटप्रूफ बनियन असा ऐवज आढळला, अशी माहिती पोलिसांनी दिली. गंदापूर यांच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे वृत्त ‘डॉन न्यूज’ने दिले आहे.

पीटीआयच्या १००० वर कार्यकर्त्यांना झाली अटक
इम्रान खान यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या १००० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी निदर्शकांवर लाठीमारही केला. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापरही केला. त्याचा उल्लेख करून इम्रान खान यांनी, कोणत्या कायद्यानुसार आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक केले जात आहे तसेच रस्त्यांची नाकेबंदी केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
बातम्या आणखी आहेत...