आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radical Taliban On Peaceful Road, First Time Discussion With Afghan Government

पाकची मध्यस्थी: कट्टर तालिबान शांतिपथावर, अफगाण सरकारशी प्रथमच चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - गेल्या १३ वर्षांपासून अफगाणिस्तानात रक्तरंजित कारवाया करून जागतिक पातळीवर क्रूर संघटना म्हणून ओळख प्राप्त केलेल्या तालिबान या दहशतवादी संघटनेने प्रथमच अफगाण सरकारशी शांततेसाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. याचा पहिला टप्पा नुकताच पार पडला असून यात मध्यस्थाची भूमिका बजावणा-या पाक सरकारने शांततेच्या दृष्टीने हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. अफगाण सरकार व तालिबानच्या प्रतिनिधींदरम्यान झालेल्या या चर्चेत अमेरिकी व चिनी प्रतिनिधींचीही उपस्थिती होती. अफगाण हाय पीस कौन्सिलने यात पुढाकार घेऊन चर्चा सुरू केली. मंगळवारी पहिला टप्पा पार पडला. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती.

अफगाणिस्तानातील अस्थिरतेवर त्याच देशाच्या पुढाकाराने तोडगा निघाला पाहिजे, अशी पाकची भूमिका आहे. त्यानुसार या चर्चेमध्ये फक्त मध्यस्थाची भूमिका बजावत पाकने पहिली फेरी घडवून आणली. विशेष म्हणजे अमेरिकी व चिनी प्रतिनधींनाही यात सहभागी करून घेण्यात आले. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने या शांतीचर्चेसंबंधी प्रथमच जाहीर घोषणाही केली. अधिकृतरीत्या याबाबत घोषणा केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.अफगाणिस्तानात शांतता नांदावी म्हणून कराव्या लागणा -या उपाययोजनांवर दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रामाणिकपणे या चर्चेतून निघालेल्या तोडग्याची अंमलबजावणी करण्यावरही तालिबान सकारात्मक असल्याचे सूत्र म्हणाले.

मोठे यश...
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ही चर्चा म्हणजे आशियामध्ये शांतता नांदण्याच्या दृष्टीने मोठे यश असल्याचे म्हटले आहे. आता ही चर्चा फिसकटू नये म्हणून दोन्ही बाजूंनी काळजी घेण्याची गरजही त्यांनी प्रतिपादीत केली.

प्रयत्न हाणून पाडा
ही चर्चा यशस्वी होऊ नये म्हणून आगामी काळात अनेक शक्ती प्रयत्न करतील. मात्र, हे प्रयत्न हाणून पाडण्याचे व चर्चेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जाण्याचे आवाहन शरीफ यांनी केले. हा प्रश्न केवळ अफगाणिस्तानपुरता मर्यादित नाही. जागतिक शांततेच्या दृष्टीने या चर्चेला वेगळे महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्व वादग्रास्त विषयांवर ताेंडगा काढणार
>चर्चेच्या माध्यमातून दोन्ही गटांमध्ये परस्परांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण करणे.
>वादग्रस्त विषयावर अडून न राहता तोडगा काढणे.
>तालिबानच्या मागण्यांवर सरकारही गांभीर्याने विचार करण्यास तयार.

रमजाननंतर पुन्हा बैठक होणार
रमजान संपताच पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व सहभागी घटक देशांच्या प्रतिनिधींनी आपसातील विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न व चर्चेतून समस्या सोडवण्यावर भर दिला . तेहरिक-ए-तालिबान व अफगाण सरकारने सहकार्य करावे, अशी अपेक्षा या वेळी पाकिस्तानने व्यक्त केली.