इस्लामाबाद - पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पटलावर नेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका महिन्यात दुसऱ्यांदा यूएन प्रमुखांना पत्र लिहून काश्मीर प्रकरणात दखल देण्यास सांगितले आहे.
शरीफ यांनी पत्रात म्हटले आहे, 'काश्मीरमध्ये मानवी हक्कांच्या पायमल्लीचे आरोप होत आहेत. त्याची सत्यता पडताळण्यासाठी यूएनने एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी तिथे पाठवावी.' याच पत्रात नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरबद्दल केलेल्या वक्तव्यांवर टीका करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या या कृत्यावर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप म्हणाले, 'त्यांनी कितीही पत्र लिहिले तरी वास्तव बदलणार नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हेच सत्य आहे आणि त्याच्या एका भागावर पाकिस्तानने बेकायदेशीर कब्जा केला आहे.'
एका न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, या पत्राची माहिती पाकिस्तान परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी दिली.
झकारिया म्हणाले, की यूएन सेक्रेटर जनरलनी काश्मीर मधील हिंसा थांबवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी शरीफ यांच्याकडे सल्ला मागितला होता.