आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट हल्ल्यामुळे भारत-पाक चर्चेवर परिणाम, शरीफ यांची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास लवकरच पूर्ण केला जाईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर विपरीत परिणाम झाला आहे, हे शरीफ यांनी कबूल केले.

शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी तपासाबद्दलची माहिती दिली. पठाणकोट हल्ल्यासाठी आपल्या भूमीचा वापर करण्यात आला होता का, याचा तपास करण्याची जबाबदारी आता आपली आहे. आम्ही याचा लवकरच छडा लावू. दोषींचा माहिती मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. दहशतवाद्यांना प्रत्येक पातळीवर पराभूत केले जात आहे. त्यामुळे भडकलेले दहशतवादी वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करू लागले आहेत. दरम्यान, पठाणकोटमधील हल्ला जैश-ए-माेहंमदच्या दहशतवाद्यांनी केला आहे, असे भारताने सांगितले आहे. त्याशिवाय भारताने यासंबंधीचे ठोस पुरावेदेखील पाकिस्तानला दिले आहेत. दरम्यान, जानेवारी रोजी पठाणकोटच्या हवाई तळावर हल्ला झाला होता. त्यात सात जवान शहीद झाले होते.

चर्चा योग्य दिशेने
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या भेटीनंतर भारत-पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा योग्य दिशेने सुरू झाली होती; परंतु पठाणकोट हल्ल्याचे नकारात्मक परिणाम झाले.

छडा लावणे कर्तव्य
आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केला जात असल्यास त्याचा छडा लावणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी तपास केला जात आहे. त्यातून सत्य समोर येईलच. जे काही सत्य असेल ते सर्वांसमक्ष ठेवण्यात येईल, अशी ग्वाही शरीफ यांनी दिली.

सहासदस्यीय समितीची स्थापना
पठाणकोट हल्ल्याच्या घटनेचा तपास करण्यासाठी शरीफ यांनी सहासदस्यीय समितीची स्थापना केली आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे.