आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांदेपालट: हाफिज सईदचा मेहुणा मक्की जमात-उद-दावाचा म्होरक्या, सईद घरात नजरकैदेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद सध्या पंजाब सरकारच्या निगराणीखाली घरात अटकेत आहे. त्याच्या जमात-उद-दावा संघटनेचा नवा म्होरक्या म्हणून सईदचा मेहुणा हाफिज अब्दुल रेहमान मक्कीने सूत्रे हाती घेतली आहेत.  

आतापर्यंत मक्की संघटनेत दुसऱ्या स्थानी होता. सईदला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मक्कीने लगेच संघटनेची सूत्रे हाती घेतली. सईदला लाहोरमधील त्याच्या घरी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पंजाब सरकारने तो तुरुंगात असल्याचे जाहीर केले आहे. संघटनेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती माध्यमांना दिली.  

पंजाब सरकारने ३० जानेवारी रोजी सईद व त्याच्या चार साथीदारांना ९० दिवसांच्या कैदेत टाकले आहे. दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. पाकिस्तानात १९९७ मध्ये दहशतवाद प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. त्यानंतरही देशातील दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव वाढल्यानंतर गेल्या वर्षीपासून दहशतवाद्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवली जात आहे. त्यात अनेक दहशतवादी मारले गेले. परंतु देशाबाहेर दहशतवादी कट रचले जातात. हे पाकिस्तान सरकारला रोखता आलेले नाही.

हाफिज सईदची तत्काळ सुटका करा
जमात-उद-दावाच्या हाफिज सईदची तत्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी म्होरक्या मक्कीने केली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारवर दबाव वाढू शकतो. त्याच्यावरील ही अटकेची कारवाई ९० दिवसांसाठी आहे. त्यादरम्यान त्याची चौकशी केली जाऊ शकते. परंतु त्यानंतर सईदची सुटका होणार किंवा न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल हे मात्र पाकिस्तान सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेेले नाही.

निर्बंधाच्या यादीत समावेश
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा दलाने सईद व त्याच्या जमात-उद-दावाच्या ३७ साथीदारांची नावे निर्बंधाच्या यादीत समाविष्ट करण्याची सूचना केली होती. तसा ठरावदेखील झाला होता. त्यानुसार पाकिस्तानने कारवाई केली आहे. पाकिस्तानने आश्वासन पाळले आहे, असा दावा गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी केला. पाकचे हे नाटक म्हटले जाते. 

लाहोरमध्ये अनेक सभा  
मक्कीने जमात-उद-दावा संघटना ताब्यात घेतली. सईदला अटक झाल्यानंतर मक्कीने सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आतापर्यंत सहा जाहीर सभा घेतल्या आहेत. त्याद्वारे त्याने सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

नवीन नावाने आधीच कारवाया सुरूच
सईदच्या अटकेची कारवाई झाल्याबरोबर जमात-उद-दावाचे नाव बदलण्यात आले. आता तेहरिक आझादी जम्मू अँड काश्मीर असे संघटनेचे नाव करण्यात आले आहे. नाव बदलून दहशतवादी कारवाया सुरूच ठेवण्याचे काम गेली अनेक वर्षे सईदच्या गटाकडून केले जात आहे.

दोघांवरही मोठे इनाम
सईदला पकडून देणाऱ्यास अमेरिकेने १ कोटी डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे. मक्कीवरही इनाम आहे. मक्कीला पकडून दिल्यास २० लाख डॉलर्स देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.
बातम्या आणखी आहेत...