आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्यांना नंदनवन नको, सर्व देशांनी दक्षता घ्यावी : सुषमा स्वराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - कोणत्याही प्रदेशात कट्टरवादी कारवायांसाठी सुरक्षित असे नंदनवन तयार होता कामा नये. दहशतवादी तत्त्वांना तशी संधी मिळू नये याची दक्षता घेतली गेली पाहिजे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले.

हार्ट ऑफ एशिया या मंत्रिस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठावरून त्या बुधवारी बोलत होत्या. अफगाणिस्तानातील दहशतवादासंबंधीच्या स्थितीचा आढावा यानिमित्ताने घेण्यात येत आहे. अफगाणिस्तानच्या एकता, सुरक्षेचे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सातत्याने समर्थन होणे गरजेचे आहे. अफगाणसोबत काम करण्याची भारताची तयारी आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण क्षमतावाढीसाठी भारत सदैव सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले; परंतु दहशतवादी भूभाग मिळवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. दहशतवाद्यांच्या या धोरणात काहीही बदल झालेला नाही. त्यांना स्थान मिळणार नाही यासाठी आपण सर्वांनी खबरदार राहिले पाहिजे. दहशतवादी सुरक्षित अशा नंदनवनाच्या शोधात असतात. तेथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. तत्पूर्वी हार्ट ऑफ एशिया परिषदेचे उद््घाटन बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते झाले. तीव्रता, व्याप्तीत वाढ : गेल्या काही महिन्यांत अफगाणिस्तानातील दहशतवादाची तीव्रता आणि व्याप्ती वाढल्याचे दिसून आले आहे. त्यातच भूप्रदेशांवर ताबा मिळवण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यांनी हे धोरण अद्यापही बदललेले नाही.
अफगाण नागरिकांना सलाम
दहशतवाद्यांच्या विरोधात भूमिकेसाठी अफगाण नागरिक आणि सुरक्षा दलास सलाम करायला हवा. त्यांनी सातत्याने कट्टरवाद्यांचा धीराने मुकाबला केला आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाच्या पाठिंब्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. भारताकडून अफगाणला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही स्वराज यांनी दिली.

घनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा : सुषमा स्वराज यांनी बुधवारी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दहशतवादाचा धोका, संपर्क, शांतता इत्यादी मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही नेत्यांत सुमारे ३० मिनिटे ही बैठक चालली. भारताकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
भारत-पाकने समंजस व्हावे
भारत आणि पाकिस्तानने परिपक्वता आणि आत्मविश्वास दाखवण्याची वेळ आली आहे. परस्परांसोबत व्यापारी संबंध विकसित करण्यासाठी अशा प्रकारे बदल केला गेला पाहिजे, असे मत स्वराज यांनी व्यक्त केले. दोन्ही देशांनी परस्परांना सहकार्य केले पाहिजे. त्यातून व्यापार विकसित होईल. प्रदेशात शांतता नांदेल. भारत सहकार्य करण्यास तयार आहे, अशी स्पष्ट भूमिकाही या व्यासपीठावरून सुषमा स्वराज यांनी मांडली आहे.
आशियाचे हृदय : शरीफ
अफगाणिस्तान आशिया खंडाच्या हृदयस्थानी आहे. म्हणूनच हृदयात काही विकार झाल्याचा त्याचा त्रास संपूर्ण शरीराला भोगावा लागतो. नेमके तेच येथे घडून येत आहे. अफगाणचा त्रास संपूर्ण प्रदेशाला सोसावा लागत आहे, असे शरीफ यांनी याप्रसंगी सांगितले. शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवून लोकशाही मार्गाने निवडलेल्या सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. आशियाच्या दृष्टीने २०१६ हे वर्ष अधिक चांगले राहील, असा आशावाददेखील शरीफ यांनी या वेळी व्यक्त केला.