पेशावर - वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वाहमधील बाचा खान विद्यापीठात बुधवारी अतिरेकी हल्ला झाला. त्यात २५ जण ठार तर ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले.
लष्कर आणि सुरक्षा दलांच्या कारवाईत हल्ला करणाऱ्या चार अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. हल्ला झाला त्या वेळी विद्यापीठात ३००० विद्यार्थी आणि मुशायऱ्यासाठी आलेले ६०० अतिथी उपस्थित होते. हल्ला कोणी केला याबाबत वेगवेगळे वृत्त येत आहे. आधी तहरीक-ए-तालिबानचा कमांडर उमर मन्सूरने हल्ल्याची जबाबदारी घेतली. तो म्हणाला की, आमच्या चार जणांनी हा हल्ला केला आहे. २०१४ मध्ये पेशावरच्या आर्मी स्कूलमध्ये लष्कराकडून मारल्या गेलेल्यांच्या हत्येचा हा बदला आहे. आर्मी स्कूलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंडही मन्सूरच होता. मात्र, संघटनेचा अधिकृत प्रवक्ता मोहंमद खोरासानी याने या हल्ल्यात आपला हात नाही, असे लेखी निवेदन जारी केले आहे. प्राथमिक तपासानुसार, अफगाणिस्तानमधून आलेल्या फोन कॉलचा या हल्ल्याशी संबंध असू शकतो.
जागतिक आर्थिक मंच परिषदेसाठी स्वित्झर्लंडमध्ये गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी पाहणी केली. राज्यपाल सरदार मेहताब खान हेही विद्यापीठात पोहोचले.
प्राध्यापकाने स्वत:चा जीव देऊन वाचवले शेकडोंचे प्राण
विद्यापीठातील जिऑलॉजीचा विद्यार्थी जहूर अहमद याने डॉन न्यूजला सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकून मी वसतिगृहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण रसायनशास्त्राचे प्राध्यापक हामिद यांनी मला बाहेर जाण्यास प्रतिबंध केला. त्यांच्या हातात पिस्तूल होते. त्यांनी ठरवले असते तर ते स्वत:ला वाचवू शकले असते. पण त्यांनी आधी इतरांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकदाच गोळीबार केला. त्याच वेळी त्यांना एक गोळी लागली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
हल्लेखोरांनी थेट डोक्यात झाडल्या गोळ्या
बाचा खान विद्यापीठ पेशावरपासून ५० किमीवरील चारसद्दा आहे. पोलिसांनुसार, बंदूकधारी सकाळी ९.३० च्या सुमारास विद्यापीठ परिसरात आले. आत घुसताच त्यांनी वर्ग आणि वसतिगृहातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांवर गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी अनेक विद्यार्थ्यांच्या थेट डोक्यात गोळ्या झाडल्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
बाचा खान स्मृतिप्रीत्यर्थ होता मुशायरा कार्यक्रम
हल्ल्याच्या वेळी विद्यापीठात खान अब्दुल गफार खान यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुशायरा सुरू होता. गफ्फार खान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महानायकांपैकी एक होते. त्यांना बाचा खानही संबोधले जात असे. त्यांच्या नावानेच हे विद्यापीठ स्थापन झाले आहे.
तीन तास चालली कारवाई
हल्ल्यानंतर या भागात आणीबाणी लागू केली. शाळा-कॉलेजेस बंद केले. सुरक्षा दले आणि पेशावरहून आलेल्या लष्कराच्या दलाने मोर्चा सांभाळला आणि अतिरेक्यांविरुद्ध कारवाई सुरू केली. तीन तासांच्या कारवाईत सर्व अतिरेकी मारले गेले. दरम्यान, पाकिस्तान तहरीक-ए-इन्सान पक्षाचे नेते शौकत युसूफझई यांनी सांगितले.
- ‘निरपराध विद्यार्थी आणि नागरिक यांच्यावर हल्ला करणारे कुठल्याच धर्माचे नसतात. त्यांचा खात्मा करू’
- नवाझ शरीफ, पंतप्रधान, पाकिस्तान
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, बाचा खान विद्यापीठ परिसरातील फोटो....