आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला उज्माला वाघा सीमेपर्यंत सुरक्षित पोहोचवा, पाकिस्तानी न्यायालयाचा आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उज्मा नावाच्या या भारतीय महिलेला मायदेशी परतण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानी व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून आपल्याशी विवाह केला, असा आरोप उज्माने केला होता. आरोप केल्यानंतर उज्मा पाकिस्तानमधील भारतीय दूतावासात राहत होती. उज्माला वाघा सीमेपर्यंत सुरक्षितपणे सोडा, असा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. ती केव्हा भारतात परतणार हे अद्याप स्पष्ट नाही.  
 
उज्मा नवी दिल्लीची रहिवासी असून ती याच महिन्यात पाकिस्तानला गेली होती. मलेशियात ताहीर अली नावाच्या पाकिस्तानी नागरिकाशी आपली भेट झाली होती आणि त्याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते, ताहीरने ३ मे रोजी जबरदस्तीने आपल्याशी विवाह केला, असे तिचे म्हणणे आहे.

उज्माने १२ मे रोजी पाकिस्तानमध्ये याचिका दाखल केली होती. त्यात तिने म्हटले होते की, मला भारतात परतायचे आहे. भारतात आपली पहिली मुलगी असून ती थॅलेसेमिया नावाच्या आजाराने पीडित आहे, असेही तिने म्हटले आहे. आपल्याला पत्नीला भेटू द्यावे, अशी मागणी करणारी याचिका ताहीर अलीने दाखल केली होती. मात्र, उज्माने त्याला भेटण्यास नकार दिला होता.  
 
न्यायमूर्ती मोहसीन अख्तर कयानी यांच्या एकसदस्यीय न्यायपीठाने उज्मा आणि ताहीर या दोघांच्या याचिकांवर सुनावणी केली आणि नंतर उज्माला परतण्याची परवानगी दिली. अलीने इमिग्रेशनची कागदपत्रेही परत करावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

ताहीरचे म्हणणे आहे की न्यायालयाने माझी बाजू ऐकूनच घेतली नाही. ताहीरच्या म्हणण्यानुसार, उज्मा अजूनही माझी पत्नी आहे. तिने तलाक मागितलेला नाही आणि ताहीरनेही तिला तलाक दिलेला नाही. पाकिस्तानच्या कायद्यानुसार, उज्मा आपला खटला लढवण्यासाठी पाकिस्तानला येऊ शकते. 
बातम्या आणखी आहेत...