आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माझ्या मुलाची शिक्षा माफ करा’; भारतीय अभियंत्याच्या आईचे पाकिस्तानकडे साकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- माझ्या मुलाला झालेली शिक्षा आता माफ करावी, असे साकडे एका भारतीय अभियंत्याच्या आईने पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसैन यांना घातले आहे. या अभियंत्याची फेसबुकवर एका पाकिस्तानी मुलीशी मैत्री झाली होती. तिला भेटण्यासाठी तो अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात घुसला होता. त्याला तीन वर्षे जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

  
हामिद अन्सारी असे या भारतीय अभियंत्याचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी आहे. तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये सहायक प्राध्यापक अाहे. हामिदची फेसबुकमार्फत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहात येथील एका मुलीशी मैत्री झाली होती. आपला हक्क मिळणार नाही, अशी भीती तिला वाटली. त्यानंतर हामिद अन्सारीने तिची सुटका करण्याचा पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याला पाकिस्तानचा व्हिसा मिळू शकला नाही. त्यामुळे तो विमानाने अफगाणिस्तानला गेला आणि तेथून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला. त्याच्याजवळ कुठलीही वैध कागदपत्रे नव्हती. त्याला १४ नोव्हेंबर २०१२ रोजी कोहातमधील एका हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून म्हणजे पाच वर्षांपासून तो पाकिस्तानच्या कोठडीत आहे. त्याच्यावर अवैध प्रवेशाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लष्करी न्यायालयाने १५ डिसेंबर २०१५ रोजी तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.  
पाकिस्तानमधील मानवी हक्क कार्यकर्ते आय. ए. रेहमान म्हणाले की, हामिद अन्सारीने गुन्हा केला आहे याबाबत कुठलीही शंका नाही, पण त्याने नैराश्यात असलेल्या एका मुलीला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल त्याला शिक्षाही झाली आहे. आता त्याची तत्काळ सुटका करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.  


दुसरीकडे, दोन वर्षांपूर्वी हामिद अन्सारीच्या प्रकरणाचा पाठपुरावा करणारी पाकिस्तानी महिला पत्रकार शहजादी पुन्हा बेपत्ता झाली आहे. काही लोकांनी १९ ऑगस्ट २०१५ रोजी तिचे अपहरण केले होते. त्यानंतर ती गेल्या ऑक्टोबर महिन्यात घरी परतली होती. तिला कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती. आता ती पुन्हा बेपत्ता झाली आहे, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.  या प्रकरणाच्या चौकशीचीही मागणी होत आहे.

 

हामिदशी फोनवर बोलू देण्याचीही केली विनंती
हामिदच्या आईने पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, हामिद अन्सारीपेक्षा जास्त गंभीर गुन्हे केलेल्या विदेशी नागरिकांना तुम्ही माफी दिली आहे. हामिद शिक्षा सुनावण्याआधी तीन वर्षे कोठडीत होता. हा कालावधी शिक्षा भोगल्याचा म्हणून ग्राह्य धरावा आणि त्याची सुटका करावी. तसेच हामिदशी दूरध्वनीवर बोलण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...