इस्लामाबाद - भारताला युरेनियम पुरवठा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयार असून देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हा करार लाभदायी ठरेल, असे मत परराष्ट्रमंत्री ज्युली बिशप यांनी व्यक्त केले. यासंबंधी आवश्यक ते सर्व सुरक्षेचे उपाय योजण्यासाठी दोन्ही देशांत वाटाघाटी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताची अणुऊर्जेची गरज व देशांतर्गत वीजपुरवठ्याची निकड लक्षात घेता ऑस्ट्रेलिया सहकार्य करण्यास तयार आहे. भारतातील आर्थिक विकासाचा दरही समाधानकारक असल्याचे मत बिशप यांनी मांडले.ऑस्ट्रेलियात मुबलक कोळसा, युरेनियम तसेच नैसर्गिक गॅस असून जगाला निर्यात करण्याची क्षमता असल्याचे ज्युली यांनी पाकिस्तानात घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. या वेळी पाक पंतप्रधानांचे राष्ट्रीय संरक्षण व परराष्ट्र सल्लागार सरताज अझिझ यांची उपस्थिती होती. भारताच्या विकासात ऑस्ट्रेलिया सातत्याने सहकार्य करेल. पाकिस्तानलाही मदत करण्याची तयारी त्यांनी या वेळी दर्शवली.