आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरीफांचा निर्णय 9 ऑक्टोबरला, मुलांविरोधात अटक वॉरंट जारी; आरोप निश्चित होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- भ्रष्टाचाराच्या तीन खटल्यांत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर आता ९ ऑक्टोबर रोजी आरोप निश्चित होतील. पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटॅबिलिटी ब्युरोने (एनएबी) शरीफ यांच्या वकिलाच्या मागणीवरून आरोप निश्चित करण्यास तूर्तास स्थगिती दिली आहे.  मात्र, न्यायालयाने शरीफ यांचे पुत्र हुसेन, हसन आणि जावई मोहंमद सफदर यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहेत. 

मुलगी मरियम नवाज यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. पनामा पेपर प्रकरणात नाव उघडकीस आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून नवाझ शरीफ यांना २८ जुलै रोजी पंतप्रधानपद सोडावे लागले होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची बँक खाती तसेच संपत्ती सील केली आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या तीन खटल्यांच्या सुनावणीसाठी सोमवारी त्यांनी कुटुंबीयांसह  नॅशनल अकाउंटॅबिलिटी कोर्टात हजेरी लावली. 

या वेळी त्यांचे वकील ख्वाजा हॅरिस यांनी युक्तिवाद केला की, आरोप निश्चित करण्याच्या प्रक्रियेपूर्वी खटल्यातील सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर व्हायला हवे. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सुमारे तासभर चाललेल्या सुनावणीनंतर शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे नेते मोहसीन शाहनवाज रांझा यांनी प्रक्रियेस स्थगिती दिल्याची माहिती दिली. आरोपनिश्चिती अद्याप प्रलंबित असून ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीत त्यावर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.  

शरीफपुत्रांविरोधात अटक वॉरंट  
बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी न्यायालयाने नवाझ शरीफ यांचे पुत्र हुसेन आणि हसन तसेच जावई मोहंमद सफदर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. “नवाझ यांची मुलगी मरियम आणि जावई मोहंमद सफदर हे पुढील सुनावणीवेळी न्यायालयासमोर उपस्थित राहतील. मात्र, ते दोघेही आपल्या आजारी आईच्या सेवेसाठी लंडनमध्ये असून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करू नये,’ अशी विनंती वकील रांझा यांनी न्यायालयास केली. परंतु, न्यायालयाने विनंती फेटाळून लावत अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. दरम्यान, याच प्रकरणातील अन्य एक आरोपी आणि पाकिस्तानचे अर्थमंत्री इसाक दार यांनी नॅशनल अकाउंटॅबिलिटी कोर्टाच्या निर्णयास इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.  

शरीफांची हजेरी, न्यायालय परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था  
लंडनमध्ये नवाझ शरीफ यांच्या पत्नी कुलसुम यांच्यावर गळ्याच्या कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. नुकत्याच त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यामुळे  शरीफ यांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष न्यायालयात येण्यास सवलत द्यावी, अशी मागणी मागील सुनावणीवेळी वकिलाने केली होती. परंतु, ती न्यायालयाने फेटाळून लावल्याने शरीफ २५ सप्टेंबर रोजी पाकिस्तानात परतले होते. सोमवारच्या सुनावणीवेळी न्यायालयात अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पाकिस्तान सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही सुनावणीवेळी कोर्टात येण्यास परवानगी नव्हती.
बातम्या आणखी आहेत...