आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाने हेटाळणी केली तेव्हा पाकने दिली साथ, जिनपिंग यांना 'निशान-ए-पाकिस्तान'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - ज्या वेळी अवघ्या जगाने साथ सोडली होती. त्या वेळी फक्त पाकिस्तानच आमच्या पाठीशी उभा होता, अशा भावना चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेत व्यक्त केल्या. पाकिस्तान सरकारकडून "निशान-ए-पाकिस्तान' या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानार्थ अवघ्या पाकिस्तानात उत्साहाचे वातावरण दिसून आले.

शी जिनपिंग यांनी पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. त्या वेळी पाक संसदेचे खासदार, चीनच्या प्रथम महिला पेंग लियुआन, राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, लष्करप्रमुख, राजकीय नेते आणि अन्य महत्वपूर्ण व्यक्ती उपस्थित होते. पाकिस्तानच्या संसदेला संबोधित करणारे शी जिनपिंग हे चीनचे पहिलेच राष्ट्रपती आहेत. या वेळी त्यांनी संसद भवनात सौरऊर्जा प्रणालीचाही शुभारंभ केला.

जिनपिंग म्हणाले, जेव्हा अवघ्या जगाने चीनला एकटे पाडून टाकले होते. तेव्हा पाकिस्तानने चीनची मदत केली होती. त्याबद्दल चीनच्या १.३ अब्ज नागरिकांकडून मी पाकिस्तानच्या माझ्या तमाम बांधवांना शुभेच्छा देतो. चीन आणि पाकिस्तानमधील संघर्षाने या दोन्ही देशांची मने जुळवली आहेत. पाकिस्तानच्या दौ-यावर येणारा मी चीनचा पहिलाच राष्ट्रपती आहे. मात्र, मी पाकिस्तानबद्दल अजिबातच अनभिज्ञ नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, पाकिस्तान संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने सुरुवात झाली. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष एयाज सादिक यांनी या वेळी जिनपिंग यांची तोंडभरून स्तुती केली.
पाकिस्तानने केली आहे चीनची मदत

जिनपिंग म्हणाले की, आम्हाला गरज होती तेव्हा पाकने हवाई क्षेत्र खुले केले. आमच्याशी राजकीय संबंध बनवणारे पाकिस्तान पहिले राष्ट्र आहे. भारतातील दहशतवादास खतपाणी घालण्याबाबतची पाकची भूमिका सर्वश्रुतच आहे, परंतु जिनपिंग यांनी हा मुद्दा बाजूला ठेवत चीनमधील दहशतवादाचा नायनाट करण्यात पाकची महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटले. येमेनच्या संघर्षात अडकलेल्या १७६ पाक नागरिकांना चीनने तर चीनच्या ८ नागरिकांना पाकने वाचवल्याचेही त्यांनी सांगितले.

चीनचे संरक्षण, आमचे संरक्षण : शरीफ
या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संसदेत भाषण केले. चीनचे संरक्षण हे आमच्यासाठी पाकिस्तानचे संरक्षण केल्यासारखे आहे. दोन्ही देश एकत्रित येऊन दहशतवाद संपवू, असे त्यांनी भाषणात म्हटले.

जिनपिंग यांच्यासमारे नवाज शरीफ यांनी काढला इम्रान खान यांना चिमटा
राष्ट्रपती जिनपिंग सर्व खासदार आणि नेत्यांची भेट घेत होते त्या वेळी पंतप्रधान नवाज शरीफ हेसुद्धा त्यांच्यासोबतच होते. दरम्यान, तेहरिक ए पाकिस्तानचे प्रमुख इम्रान खान यांच्याजवळ ते दोघेही पोहोचले. या वेळी नवाज शरीफ यांनी त्यांचा चिमटा काढला. तुमच्या धरणे आंदाेलनामुळेच मागचा दौरा रद्द करण्यात आला होता, असे इम्रान खान यांना सांगा असे त्यांनी जिनपिंग यांना सांगितले. त्यावर इम्रान खान यांनीही लागलीच प्रत्युत्तर दिले. आमच्या धरणे आंदोलनामुळे तुमचा दौरा रद्द झाला नाही. या आंदोलनाच्या ४ महिन्यांनंतरही तो झाला असता, असे इम्रान खान या वेळी म्हणाले.