आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Chhotubhai Makan Who Met Mahatma Gandhi, Mandela

महात्मा गांधी, मंडेला दोघांनाही भेटणारे छोटूभाई माकन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचे छोटूभाई माकन हे नाव जेवढे साधे तेवढेच ऐतिहासिक ठरावे असे आहे. कारण नव्वद वर्षांचे छोटूभाई यांनी आपल्या हयातीत जगाला दिशा देणा-या दोन महात्म्यांची भेट घेऊन एक आगळा योगायोग अनुभवला.एक भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, तर दुसरे दक्षिण आफ्रिकेचे खरेखुरे जननायक नेल्सन मंडेला. महात्मा गांधी यांनी 1930 मध्ये केलेला मिठाचा सत्याग्रह छोटूभाई यांनी याचि देही अनुभवला. त्याचबरोबर 1955 मध्ये नेल्सन मंडेला यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्याची गर्जना झाली होती. त्या सभेलादेखील छोटूभाई हजर होते. त्या सभेत वर्णभेदरहित देशाची मागणी पहिल्यांदा करण्यात आली होती. त्यानंतर 2005 मध्ये फ्रीडम चार्टरला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जोहान्सबर्ग येथील क्लिपटाऊनमध्ये आयोजित बैठकीलाही ते हजर होते. माझ्या आयुष्यात गेल्या शतकातील दोन महान नेत्यांना भेटलो ही गोष्ट माझ्यासाठी खूप विशेष आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया छोटूभार्इंनी दिली. मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी वर्णभेदी समाजरचनेच्या विरोधात जनआंदोलन उभे करून देशातील लोकशाहीची फेररचना केली होती. त्यांचे गेल्या आठवड्यात गुरुवारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.
मदिबांना शेकहँड
सन 2005 चा हा प्रसंग. मदिबा (मंडेला) यांची सभा होती. त्यात हिंदू प्रार्थनेसाठी मला सरकारकडून विशेष निमंत्रण मिळाले होते. प्रार्थनेनंतर मी लगेचच सुरक्षा रक्षकांची परवानगी घेतली आणि मदिबांना भेटलो. मी त्यांना शुभेच्छा दिल्या. फ्रीडम चार्टरच्या वेळचा मी साक्षीदार आहे. तुमच्या चळवळीतील जसमत नाना यांचा जवळचा सहकारी आहे, असा परिचय करून दिल्यानंतर मदिबांना अत्यानंद झाला. त्यानंतर ते मंचावर उठून उभे राहिले आणि माझा हात हातात घेत शुभेच्छा दिल्या. तो क्षण आजही आठवतो. -छोटूभाई माकन