आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Student Can Change World, Malala Give Speech At United Nation

एक विद्यार्थी जग बदलू शकतो, संयुक्त राष्‍ट्राच्या व्यासपीठावर मलालाचे भाषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्‍ट्र - एक विद्यार्थी, शिक्षक एक पुस्तक, एका लेखणीद्वारे जगात बदल घडवता येऊ शकतो, असा विश्वास पाकिस्तानी विद्यार्थिनी मलाला युसूफझाई हिने व्यक्त केला. मुलींच्या शिक्षण हक्काबद्दल जनजागृती आणि तालिबानी दहशतवादाचा धाडसीपणे मुकाबला करणा-या मलालाचे शुक्रवारी संयुक्त राष्‍ट्राच्या सभागृहात भाषण झाले. निमित्त होते पहिल्या जागतिक मलाला दिनाचे.


मलालाचा शुक्रवारी वाढदिवस होता. तो मलाला दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्‍ट्राने घेतला आहे. यानिमित्त संयुक्त राष्‍ट्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सरचिटणीस बान की मून यांच्यासोबत मलाला दाखल झाली तेव्हा दीड हजार लोकांच्या समुदायाने टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. मलाला भाषणासाठी व्यासपीठावर आली तेव्हा सर्वांनी उभे राहून तिला अभिवादन केले. गुलाबी वेश परिधान केलेल्या 16 वर्षीय निरागस मलालाने ठामपणे तिची मते मांडली. तालिबानी हल्ल्यानंतर ती प्रथमच एखाद्या सभेत बोलत होती. ती म्हणाली,‘मी तालिबानी किंवा कुठल्याही दहशतवादी संघटनेच्या विरोधात नाही. मला बंदूक जरी दिली तरीही मी कुणाला गोळी मारणार नाही. मलाला कुणाच्या विरोधात नाही. पण जो कुणी आपल्या हक्कांसाठी लढा देत असेल अशा प्रत्येक व्यक्तीचा मलाला आवाज आहे. आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करणा-या महिला, लहान मुले व युवतींच्या हक्कांसाठी माझी लढाई आहे. जगात त्यासाठी दररोज अनेक मुले, तरुणी व महिला मारल्या जातात. त्या सर्वांचा मी आवाज आहे.’


गेल्या वर्षी पाकिस्तानात पेशावर येथे मलालाला तालिबानी अतिरेक्यांनी गोळी मारली होती. तिचा अपराध इतकाच होता की ती शाळेत जाऊ इच्छित होती. नंतर तिच्यावर लंडनमध्ये उपचार करण्यात आले. आता ती पुन्हा शाळेत जाऊ लागली आहे. परंतु तिचा डावा डोळा खराब झाला आहे.


पाकमध्ये कार्यक्रम नाही
युनोच्या आवाहनानंतर जगभरात शुक्रवारी मलाला दिन साजरा झाला. परंतु पाकिस्तान किंवा पेशावरमध्ये कोणताच कार्यक्रम झाला नाही. पाक सरकारनेही यानिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित केला गेला नाही. पंजाब प्रांतात सध्या इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ पक्षाचे सरकार आहे.


शिक्षण, शांततेवर भर, अहिंसा तत्त्वाची प्रशंसा
मलालाने तिच्या संपूर्ण भाषणात विशेषत: मुलींच्या शिक्षणावर भर दिला. तिने शांतात, अहिंसेचा ठाम शब्दांत पुरस्कार केला. तिने भाषणाची सुरुवात अल्लाचे नाव घेऊन केली. तिने भगवान बुद्ध आणि जीझसचेही नाव घेतले. मोहंमद अली जिना, नेल्सन मंडेला, खान अब्दुल गफार खान यांचा उल्लेख तिने केला. महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वाची तिने प्रशंसा केली.