काबूल - पाकिस्तान-अफगाण सीमेवर अमेरिकी हवाईदलाच्या मदतीने अफगान सैन्याने चढवलेल्या हल्ल्यात 60 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. अफगाणिस्तानच्या गुप्तहेर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानसमर्थक हक्कानी गटावर केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. अमेरिकी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य मागे घेतले जाईल. यामुळे तालिबानशी संबंधित सर्व दहशतवादी संघटनांवरील हल्ले आणखी तीव्र करण्यात आले आहेत. हक्कानी गटाच्या जवळपास 300 दहशतवाद्यांनी सोमवारी पक्तिका प्रांतातील जिरक येथील अफगाणिस्तानी सैन्याच्या शिबिरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर अफगाणी सैन्याच्या प्रत्युत्तरात 60 दहशतवादी ठार झाले. राष्ट्रीय सुरक्षा सचिवालयाने ही माहिती दिली. मात्र, नाटो संचलित आंतराष्ट्रीय सैन्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.