आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afganistan Attack News In Marathi, Kabul, Indian Consulate

अफगाणच्या भारतीय वाणिज्य दूतावासावर अतिरेकी हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल- अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात शस्त्रास्त्रांनी सज्ज चार अतिरेक्यांनी शुक्रवारी सकाळी भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला चढवला. आयटीबीपी आणि अफगाण सुरक्षा दलाच्या जवानांनी सुमारे नऊ तास चाललेल्या चकमकीनंतर सर्व अतिरेक्यांना ठार केले. सर्व भारतीय आणि राजनैतिक कर्मचारी सुरक्षित आहेत. कोणत्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत अमर सिन्हा यांनी सांगितले की, हल्लेखोरांकडे मशीन गन आणि रॉकेट संचलित ग्रेनेडही होते. आयटीबीपीच्या जवानांनी एका हल्लेखोराला दूतावासाच्या भिंतीवर चढताना ठार केले, तर तीन हल्लेखोरांना अफगाणिस्तानच्या सुरक्षा जवानांनी ठार केले. दूतावासाच्या परिसरातच वाणिज्य दूताचे निवासस्थानही आहे. हल्ला झाला त्या वेळी दूतावासात स्थानिक अफगाण नागरिकांबरोबरच नऊ भारतीयही होते. ते सर्व जण सुरक्षित आहेत.

हल्ल्याच्या वेळी भारत आणि अफगाणिस्तानचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते, असे नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. परराष्ट्र सचिव सुजाता सिंह सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून होत्या.
हा भारत- अफगाण संबंधांवर हल्ला
हा भारत- अफगाणिस्तानच्या संबंधांवरचा हल्ला आहे; परंतु त्यामुळे दोन्ही देशांचा दहशतवादाविरुद्ध लढण्याचा संकल्प आणखी दृढ होईल, असे भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत शाइदा मोहंमद अब्दाली यांनी म्हटले आहे.

हल्ल्यांना भारत भीक घालत नाही : मनमोहन
काळजीवाहू पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून अतिरेक्यांचे षड्यंत्र उधळून लावल्याबद्दल भारत आणि अफगाणिस्तानच्या सुरक्षा जवानांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, ‘अशा हल्ल्यांना भारत भीक घालत नाही आणि त्यामुळे भारत- अफगाणिस्तानच्या संबंधावर कोणताही परिणाम होणार नाही. भारताचे अफगाणिस्तानला सहकार्य यापुढेही सुरूच राहील.’

करझाईंचे मोदींना आश्वासन
या हल्ल्यानंतर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करझाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. ‘करझाई आणि मी वाणिज्य दूतावासावरील हल्ल्याच्या बाबतीत चर्चा केली आहे. त्यांनी मला अफगाणिस्तानातील भारतीय मिशनच्या सुरक्षेची हमी दिली आहे,’ असे ट्विट मोदींनी केले आहे.

अफगाणिस्तानला भारतीय मदत
भारताने अफगाणच्या अनेक पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यात हेरात प्रांतातील सलना जलविद्युत धरण आणि काबूलमधील अफगाण संसदेच्या इमारतीचा समावेश आहे. भारत अफगाणिस्तानला सुमारे 2 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 117 अब्ज रुपयांची मदत करत आहे. एवढय़ा मोठय़ा रकमेची मदत करणारा भारत हा या क्षेत्रातील एकमेव देश आहे.