आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणला अजूनही दहशतवादाचा धोका- परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- तीन दशकांपासून संघर्षात अडकलेल्या अफगाणिस्तानला दहशतवादाचा धोका अद्याप कायम असून अफगाणला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत करण्याचे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी केले आहे. अफगाणिस्तानच्या मदतीसाठी येथे जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात 70 देश आणि संस्था सहभागी झाल्या आहेत.
अफगाणिस्तान परिषदेत कृष्णा म्हणाले की, अफगाणिस्तानला देशांतर्गत व सीमारेषेपलीकडील दहशतवादाला सामोरे जावे लागत आहे. या स्थितीतून सावरण्यासाठी अफगाणिस्तानला आंतरराष्टीय समुदायाने मदत करणे आवश्यक आहे. विकास प्रक्रियेसाठी अफगाणिस्तान व आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 2014 पर्यंत संबंध प्रस्थापित करण्याचा उद्देश या परिषदेचा आहे. आंतरराष्टीय समुदायाने दहा वर्षांत केलेल्या प्रयत्नांना बळ देणे आवश्यक आहे. चांगल्या प्रशासनाच्या जोरावरच प्रबळ देशाची निर्मिती होत असते, परंतु त्याचबरोबर आपल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणारे सक्षम सरकार त्यासाठी आवश्यक आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या तशी परिस्थिती निर्माण झाली नाही, असे कृष्णा म्हणाले. परिषदेमध्ये त्यासाठीचा आराखडा तयार केला जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अफगाणिस्तानच्या विकास प्रक्रियेसाठी भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे सांगत कृष्णा म्हणाले की, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या गेल्या वर्षीच्या अफगाण दौºयात त्यांनी 500 डॉलरची अतिरिक्त मदत देण्याची घोषणा केली. यामुळे भारताची अफगाणिस्तानला मदत 2 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
16 अब्ज डॉलर मदतीचा संकल्प- विदेशी फौजा परतल्यानंतर संभाव्य संकटांचा सामना करता यावा यासाठी अफगाणिस्तानला 16 अब्ज डॉलर मदत करण्याचा संकल्प टोकियो परिषदेत व्यक्त करण्यात आला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि अमेरिकी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यातील चर्चेत 4 अब्ज डॉलर मदत देण्याची मागणी करण्यात आली होती. 2015 पर्यंत 16 अब्ज डॉलर नागरी मदत देण्याचे आवाहन जपानने जागतिक समुदायाकडे केले होते.