आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afghanistan Hints At Pak Link To Kabul Hotel Attack

काबूलच्या भारतीय वकिलातीवरील हल्ला आयएसआयच्या सांगण्यावरूनच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - काबूलमधील भारतीय वकिलातीवर 2008 मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ला आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेतील अधिकार्‍यांच्या संमतीने झाला होता, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे.

7 जुलै 2008 रोजी काबूलमधील भारतीय वकिलातीवर आत्मघातकी कार बॉम्बचा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोन उच्चपदस्थ भारतीय अधिकार्‍यांसह 58 जण ठार, तर 140 जण जखमी झाले होते. या वकिलातीवरील हल्ला आयएसआयच्या एजंटांनीच घडवून आणला होता. पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेतील अत्यंत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्याच संमतीनुसारच हा हल्ला घडवून आणण्यात आला होता, असे ज्येष्ठ पत्रकार कार्लोट गाल यांनी त्यांच्या ‘द राँग एनिमी : अमेरिका इन अफगाणिस्तान 2001-2014’ या पुस्तकात लिहिले असून पुढील महिन्यात हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे. तत्कालीन बुश प्रशासनाला फोन कॉल इंटरसेप्टच्या माध्यमातून या हल्ल्याबाबतची गोपनीय माहिती मिळूनही हा भीषण हल्ला रोखण्यात त्यांना अपयश आले, असे त्यांनी म्हटले आहे. गाल या 9/11 नंतर अफगाणिस्तान भूमीवर राहिलेल्या एकमेव पाश्चिमात्य महिला पत्रकार असून त्यांनी दहा वर्षे अफगाणिस्तान- पाकिस्तान संघर्षाचे वार्तांकन केले आहे.

अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या दक्षता अधिकार्‍यांनी पाकिस्तानच्या आयएसआय अधिकार्‍यांच्या फोन कॉल्समध्ये घुसखोरी केली. ते काबूलमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचे नियोजन करत असल्याचे त्यांनी ऐकले. त्याच वेळेला या फोन कॉल्सवर देखरेख करणार्‍या गुप्तहेर अधिकार्‍यांना उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या सहभागाने नेमके कशाचे नियोजन केले जात आहे, हे माहीत नव्हते. पण हे अधिकारी दहशतवादी हल्ल्याला प्रोत्साहन देत होते हे स्पष्ट होते, असे गाल यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

अफगाणिस्तानला एकटे पाडण्याचे षड्यंत्र
अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीत गुंतलेल्या भारतासह 42 देशांना करझाई सरकारला पाठिंबा देण्याची किती मोठी किंमत मोजावी लागू शकते हा संदेश देण्यासाठी आयएसआयने कार बॉम्ब हल्ल्याचे हे षडयंत्र रचले होते. अफगाणिस्तान सरकारचा आत्मविश्वास डळमळीत करणे हाही त्या मागे हेतू होता. या सर्व देशांनी अफगाणिस्तान सोडून निघून जावे, अशी आयएसआयची इच्छा होती, असा दावा गाल यांनी या पुस्तकात केला आहे.