आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माघारीनंतर अफगाणवर पुन्हा तालिबानच्या कब्जाचा धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अफगाणिस्तानातील लष्करी तळ माघारी घेण्यात आले तर त्याचा फटका पाकिस्तानातील अल कायदाविरोधी ड्रोन मोहिमेला बसू शकतो. त्यातून आशियाई प्रदेशात आण्विक संघर्ष उभा राहील, असा धोका निर्माण झाला आहे.

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानातील सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीआयएच्या ड्रोनसाठी आवश्यक असलेले तळ संकटात आले आहेत. त्यामुळे अमेरिकेने तळ माघारी घेण्याचे सूतोवाच केले आहे. कारण अफगाणिस्तानातील हा प्रदेश युद्धजन्य मानला जातो. त्यामुळे अमेरिकेने हे संकेत दिले आहेत. अमेरिकी सैन्य परतले आहेच. त्याशिवाय ड्रोन विमानेही परतल्यानंतर अफगाणिस्तानातून पाकिस्तानवर टेहळणी करण्याची मोहीम जवळपास संपुष्टात येईल. अमेरिकेने पाकिस्तानातील अल कायदाच्या प्रदेशाला लक्ष्य करण्यासाठी हवाई तळ अफगाणिस्तानात तयार केले होते, परंतु अफगाणिस्तानातून माघार घेण्याच्या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो, असे अमेरिकी गुप्तहेर यंत्रणांना वाटत असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. सीआयएचा ड्रोन तळ अफगाणिस्तानातील पूर्व प्रांतात आहे.

पाकिस्तानची धास्ती
भारताकडून आक्रमण होईल, असा कयास मांडून गेल्या काही वर्षांत पाकिस्तानने सातत्याने आण्विक शस्त्रनिर्मितीचा सपाटा लावला आहे. ही शस्त्रे सुरक्षित नसल्यामुळे अमेरिकेला पाकिस्तानातील वातावरणाची अधिक धास्ती वाटू लागली आहे. ही शस्त्रे चोरीला जाऊन दहशतवाद्यांच्या हाती पडण्याची भीती हे अमेरिकेच्या चिंतेचे मुख्य कारण आहे, असे सूत्रांनी सांगितले.

थिंक टँक कामाला लागला
गुप्तचर यंत्रणेकडून इशारा देण्यात आल्यानंतर ओबामा प्रशासनाच्या सूचनेनुसार अमेरिकेचा थिंक टँक कामाला लागला आहे. अफगाणिस्तानसोबतचा सुरक्षा करार जर होऊ शकला नाही तर पर्यायी व्यवस्था तयार करण्यासाठी अमेरिकेने तयारी सुरू केली आहे. गुप्तचर टीम, लष्कर, विशेष मुत्सद्द्यांचा त्यात समावेश आहे.

दोन प्रस्ताव
अफगाणिस्तानातून शब्दश: माघार घेण्यासंबंधीचे दोन प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहेत. पेंटागॉनकडून हे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. पहिल्या प्रस्तावात अमेरिकेचे 10 हजार सैन्य देशात ठेवण्याची सूचना आहे. त्यांच्याद्वारे अफगाणिस्तानी सैन्याला दहशतवाद प्रतिबंधक कारवाईसंदर्भात प्रशिक्षण देण्याचे सुचवण्यात आले आहे. ड्रोन आणि नियंत्रण तळ असलेल्या पूर्व अफगाणिस्तानातील तैनातीच्या प्रशिक्षणाचाही त्यात समावेश आहे. दुसरा प्रस्ताव एकही सैनिक देशात न ठेवण्याचा आहे. 2014 नंतर सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याचा प्रस्ताव आहे.

ओबामांना काय वाटते ?
नाटोची मोहीम या वर्षी अखेरच्या टप्प्यात आली आहे. त्यानंतर 8 ते 12 हजार सैनिक संवेदनशील भागात तैनात ठेवावेत. त्यात अमेरिका आणि सहकारी देशांच्या लष्कराचा समावेश असावा, असे राष्ट्राध्यक्षांना वाटते.

चिंता नेमकी काय ?
अफगाणिस्तानातील पर्यायी हवाई तळ पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फारशी प्रभावी ठरत नाहीत. कारण अल कायदाचे दहशतवादी दडून बसलेला भाग अत्यंत दुर्गम, डोंगराळ आहे. पर्यायी तळावरून दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवणे जवळपास अशक्य असल्याचे गुप्तहेर यंत्रणांना वाटते. भविष्यात दुर्दैवाने भारत-पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध झाले, तर परिस्थिती हाताळणेदेखील कठीण होईल, असे गुप्तहेर अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.