आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 24 Hours Of Blast In Boston Marathon No Any Clue In The Hands Of Investigation Officer

बोस्टन मॅरेथॉन बॉम्बस्फोटाचा 24 तासांनंतरही सुगावा लागेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्टन- बोस्टन मॅरेथॉनदरम्यान झालेला दुहेरी बॉम्बस्फोट मूलतत्त्ववाद्यांचा संभाव्य हल्ला असल्याचे सांगण्यात येत असून या स्फोटाच्या तपासाची जबाबदारी एफबीआयकडे सोपवण्यात आली आहे. हा दहशतवादी हल्ला आहे की नाही, यावरून अमेरिकी तपास संस्थांमध्येच मतभेद निर्माण झाले आहेत. स्फोटाचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी एफबीआय आणि होमलँड सेक्युरिटीने मंगळवारी एका बहुमजली अपार्टमेंटची तब्बल नऊ तास झडती घेतली. या स्फोटात तीन जण ठार, तर 153 हून अधिक जण जखमी झाले होते.

रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटात जखमी झालेल्या 153 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यापैकी 17 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर, तर 25 जण गंभीर आहेत. जखमींपैकी 8 मुले आहेत. स्फोटातील मृतांमध्ये एका 8 वर्षीय मुलाचा समावेश आहे. 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत झालेल्या या पहिल्याच बॉम्बस्फोटामुळे एफबीआयने व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. बॉम्बस्फोट करणा-यांचा लवकर छडा लावण्यासाठी बोस्टन पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून ते रात्रंदिवस तपासाची चक्रे फिरवत आहेत. एफबीआय आणि होमलँड सेक्युरिटीचे एजंट्स रिव्हिर येथील वॉटर्स एज या उंच अपार्टमेंटमध्ये शिरताना दिसले, असे बोस्टन ग्लोबने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हव्या असलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी हे झडती सत्र होते, असे रिव्हर अग्निशामक दलाने फेसबुक पेजवर लिहिले आहे. ही व्यक्ती सौदी नागरिक असून ती विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत आलेली आहे. या ठिकाणाहून अनेक बॅग बाहेर काढण्यात आल्या. मात्र, तपास यंत्रणेच्या अधिका-यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.

ओबामा, एफबीआय आणि तज्ज्ञांची भिन्न मते
बॉम्बस्फोटास जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. हा स्फोट दहशतवादी कृत्य असल्याचे संबोधू नका, असे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले होते, परंतु त्यानंतर हा बॉम्बस्फोट म्हणजे दहशतवादी कृत्यच असल्याचे व्हाइट हाऊसने सांगितले. स्फोटाबाबत हवेत अंदाज बांधणे मूर्खपणा ठरू शकतो, असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे, काही विश्लेषकांच्या मते यामागे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क असण्याची शक्यता आहे, तर एफबीआयने कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे म्हटले आहे.

भारताकडून निषेध
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बोस्टन हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बोस्टनमधील बॉम्बस्फोट हे मूर्खपणा आणि क्रूरपणाचे कृत्य असल्याचे पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अन्य ठिकाणीही बॉम्ब आढळले
बोस्टन पोलिसांना अन्य दोन ठिकाणीही जिवंत बॉम्ब आढळले. मात्र, त्यांचा स्फोट झाला नाही. या बॉम्बस्फोटांनंतर अमेरिकेतील न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, शिकागो आणि वॉशिंग्टनसह अनेक महानगरांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून तेथील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

कृष्णवर्णीय माणसाचा शोध सुरू
हे बॉम्बस्फोट एका कृष्णवर्णीय व्यक्तीने घडवून आणले आहेत, असा संशय आहे. ती व्यक्ती परदेशी वंशाची असावी. त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅग असून त्याने घामाने डबडबलेला शर्ट घातलेला आहे. पहिला स्फोट होण्याच्या पाच मिनिटे आधी ही व्यक्ती फिनिश लाइनजवळील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. एफबीआय त्याचा शोध घेत आहे.