ओस्लो (नॉर्वे) - प्रख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान आणि त्यांची दोन मुले अमान आणि अयान ११ डिसेंबरला ओस्लोमध्ये नोबेल शांतता पुरस्कार वितरण समारंभात सादरीकरण करतील. या समारंभासाठी उस्ताद खान व त्यांच्या मुलांनी खास राग रचला असून या माध्यमातून शांततेचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
नॉर्वेच्या राजधानीत दरवर्षी नोबेल शांतता पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळी पुरस्कारप्राप्त लोकांच्या सन्मानार्थ जगभरातील नामांकित कलाकारांना आमंत्रित केले जाते. यंदा कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसूफझई यांच्या सन्मानार्थ ओस्लो स्पेक्ट्रममध्ये उस्ताद खान यांच्याशिवाय पाकिस्तानी गायक उस्ताद राहत फते अली खान, ब्रिटनचे लोकप्रिय बॉली फ्लेक्स नृत्यकलाकार सहभागी होत आहेत.
या प्रतिष्ठित मंचावर कला सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल उस्ताद खान यांनी आनंद व्यक्त केला. यंदा एका भारतीयाला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. हे अभिमानास्पद आहे.
रागा फॉर पीस
उस्ताद खान ओस्लोमध्ये समारंभात खास राग सादर करतील. याला ‘रागा फॉर पीस’ असे नाव देण्यात आले आहे. या रागाचा मुख्य आधार भारतीय शैलीचा असून यातून शांतता, सद्भाव व अहिंसेचा संदेश देण्याचा
आपला प्रयत्न असल्याचे खान यांनी सांगितले.