आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alama Kante, The Singer Who Sang Through Surgery To Save

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शस्त्रक्रियेवेळी गायले गाणे, थोडी जरी चूक झाली तर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - प्रत्येक गायक, गायिकेचा आवाज हीच त्याची/तिची ओळख असते. हीच ओळख कायम ठेवण्यासाठी एका डॉक्टरने आपल्या रुग्णाच्या गळ्यावरील शस्त्रक्रियेदरम्यान गाणे गाण्याचा सल्ला दिला. गायिका अलामा कांतेच्या गळ्यातील गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या ध्वनिग्रंथीचे नुकसान होऊ नये यासाठी तिला गायला सांगितले होते. डॉक्टराच्या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान अलामा सूर आळवत राहिली. बॅकग्राउंड म्युझिकच्या साथसंगतीत अशा प्रकारची जगातील पहिलीच शस्त्रक्रिया पॅरिसमध्ये पार पडली.

गिनीहून येऊन फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या अलामाची येथे शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेमध्ये लोकल अ‍ॅनेस्थेशिया आणि संमोहन क्रियेचा वापर करण्यात आला होता. शस्त्रक्रियेत आपला आवाज जाण्याची भीती अलामाला होती. मात्र, तिच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेवेळी गाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गळ्यातील ट्यूमर काढण्याची जगातील पहिलीच संगीतबद्ध शस्त्रक्रिया पार पडली.

थोडी जरी चूक झाली तर...
शस्त्रक्रियेदरम्यान थोडीशी जरी चूक झाली असती तर अलामाचा आवाज गेला असता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हेन्री मॉडोर रुग्णालयातील प्रो. गिलेस डोन्यूर यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. त्यांनी दाखवलेल्या व्हिडिओत अलामा गात असल्याचे दिसते. अलामाच्या पॅराथायरॉइड ग्रंथीच्या वरती एक गाठ होती. शस्त्रक्रियेदरम्यानच्या अत्यंत नाजूक क्षणावेळीही ती गात होती. यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रिया योग्य मार्गाने चालू असल्याची जाणीव झाली.

आफ्रिकेची सफर
अलामा संमोहनकर्त्याचे शब्द ऐकून स्वत:मध्ये हरवून गेली होती. संमोहन अवस्थेत ती आफ्रिकेच्या सफरीवर होती आणि याच वेळी तिने गायला सुरुवात केली, असे फ्रान्सच्या वृत्तपत्रात म्हटले आहे. अलामा आता संपूर्ण बरी झाली आहे. ती पत्रकार परिषदेत उपस्थित होती. ती म्हणाली, शस्त्रक्रियेआधी सहलीवर जायचे काय, अशी विचारणा करण्यात आली. संमोहनात मला काहीच कळाले नाही. प्रो. डोन्यूर म्हणाले, शस्त्रक्रियेच्या शेवटी अलामा शांत होती. सर्वांनी श्वास रोखलेला होता. तिच्या तोंडून शब्द फुटल्यानंतरच सर्वांनी नि:श्वास टाकला.