आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Allhabad Kumbhamela In Harvard University Sllyabus

अलाहाबादचा कुंभमेळा हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


न्यूयॉर्क - भूतलावरील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव समजण्यात येणा-या महाकुंभमेळ्याचा हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात व्यष्ठी अध्ययन (केस स्टडी) म्हणून समावेश करण्यात येणार आहे. अलाहाबादेत सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची रसद आणि अर्थकारणाचा अभ्यास केला जाणार आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ सायन्स अँड आर्ट्स, स्कूल आॅफ डिझाइन, हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ, हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आणि प्राध्यापक हे अध्ययन करण्यासाठी अलाहाबादेत दाखल होणार आहेत. दर बारा वर्षांनी जगभरातील कोट्यवधी भक्तांची गर्दी खेचणा-या महाकुंभमेळ्याच्या विविध पैलूंवर विद्यापीठ संशोधन करणार आहे. विविध शाखांचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एकत्र येऊन एखाद्या प्रकल्पाच्या संयुक्त अभ्यास करण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

व्यवस्थापन व अभियांत्रिकीची भुरळ
काही आठवड्यांच्या आतच हे शहर (कुंभमेळ्याचे ठिकाण) बांबूच्या काठ्या वापरून उभारले जाते आणि नाहीसेही होते, असे हार्वर्ड विद्यापीठाने म्हटले आहे. हा कुंभमेळा म्हणजे नागरीकरण नियोजन, व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. एवढ्या प्रचंड मोठ्या डे-या वर विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा, शौचालये, अन्न व पाणी वितरण प्रणालीचे नियोजन, रुग्णालये व लसीकरण, पोलिस, अग्निशमन, सभेसाठी व्यासपीठ, मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठीचे मंच आदींचे व्यवस्थापन व नियोजन ही सामान्य बाब नाही, असे हार्वर्ड विद्यापीठाने म्हटले आहे.
एवढ्या प्रचंड गर्दीचा इव्हेंट भूतलावर कसा शक्य आहे?
हार्वर्ड विद्यापीठाला भारतातील कुंभमेळ्याचे आयोजन पाहून कोट्यवधी लोकांच्या गर्दीचा एवढा प्रचंड मोठा मेगा इव्हेंट कसा काय शक्य आहे, असा प्रश्न पडला आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या जिज्ञासेतूनच थेट कुंभमेळ्यात संशोधन करण्याची गरज त्यांना वाटली. कुंभमेळ्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करून याच प्रश्नाचे उत्तर शोधले जाणार आहे.