आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बोस्टन - भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योजक व जगप्रसिद्ध बोस ऑडिओ सिस्टीमचे जनक अमर बोस (83) यांचे शुक्रवारी निधन झाले. दूरदृष्टी असलेले उद्योजक आणि श्रवणशास्त्राचा प्रणेता अशी त्यांनी ओळख होती. कर्णमधूर आवाजाच्या यंत्रणेबरोबरच घरोघर, सभागृहांत तसेच वाहनांमध्ये वापरल्या जाणा-या स्पीकर्सच्या निर्मितीतही बोस यांनी जगभर विश्वास संपादन केला होता.
कंपनीचे अध्यक्ष बॉब मरेस्का आणि मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी) बोस यांच्या निधनाची घोषणा केली. एमआयटीमध्येच बोस यांनी सुमारे 40 वर्षे अध्यापनाचे काम केले होते. 2 नोव्हेंबर 1929 रोजी फिलेडेल्फियामध्ये बोस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील नोनी गोपाल बोस स्वातंत्र्यसैनिक
होते. कोलकाता विद्यापीठात शिक्षण सुरू असताना ब्रिटिश राजवटीत त्यांना अटक झाली. त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 1920 मध्ये गोपाल बोस तुरुंगातून निसटले आणि त्यांनी थेट अमेरिका गाठली. तेथे एका अमेरिकी वंशाच्या शिक्षिकेशी त्यांनी विवाह केला.
रेडिओ दुरुस्ती ते स्पीकर्स
वयाच्या तेराव्या वर्षीपासून अमर बोस यांनी स्वकमाईसाठी रेडिओ दुरुस्तीचे काम सुरू केली. फिलॉडेल्फियामध्ये एका दुकानात ते काम करत. यातून त्यांना ‘आवाजा’चा छंद जडला आणि त्यांनी नवनवीन शोध लावत आवाजाच्या दुनियेत इतिहास घडवला.
शास्त्रीय संगीताचा रसिक
एक परफेक्शनिस्ट आणि शास्त्रीय संगीताचे चाहते असलेले बोस यांनी एमआयटीमध्ये 1950 च्या काळात विद्यार्थीदशेत असताना महागडी स्टिरिओ सिस्टीम खरेदी केली. मात्र, या कर्णकर्कश्य आवाजाने ते अस्वस्थ झाले. ध्वनी अभियांत्रिकीच्या कौशल्याचा येथूनच विकास होत गेला.
वेव्ह रेडिओची प्रतिष्ठा
सतत संशोधन करून नवे काहीतरी देण्याचा अमर बोस यांचा ध्यास कायम होता. प्रसिद्ध बोस वेव्ह रेडिओ आणि बोस
नॉईस कॅन्सलिंग हेडफोन ही त्यांचीच निर्मिती. या यंत्रणा अत्यंत प्रभावी होत्या. लष्कर तसेच व्यावसायिक वैमानिकांनीही याच यंत्रणा स्वीकारल्या आहेत.
ध्वनी-श्राव्य अभियांत्रिकीवर भर
खासगी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ध्वनी-श्राव्य अभियांत्रिकीवर कायम संशोधन केले.
त्यांनी निर्मित केलेले स्पीकर्स आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा महागडी असली तरी अत्यंत विश्वासार्ह ठरली.
सन 2010 मध्ये बोस कार्पोरेशनचे उत्पन्न 2 अब्ज डॉलर होते. दोनच वर्षांपूर्वी त्यांनी आपले समभाग कंपनीच्या नावे करून टाकले.
नवे संशोधन
1968 मध्ये बोस यांनी ‘बोस 901 डायरेक्ट/ रिफ्लेक्टिंग स्पीकर’ यंत्रणा बाजारात आणली. सुमारे 25 वर्षे या यंत्रणेने बाजारपेठेवर राज्य केले. या यंत्रणेचे वैशिष्ट्य असे होते की, सामान्य स्पीकर्समार्फत बाहेर पडणारा ध्वनी केवळ सरळ रेषेत बाहेर पडत असे. बोस-901 मध्ये थेट आणि परावर्तीत ध्वनीचा अभास निर्माण करणारी यंत्रणा होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.