आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरतिथी उत्सवास आजपासून प्रारंभ, विदेशातील हजारो मेहेरप्रेमी शहरात दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अवतार मेहेरबाबांच्या ४६ व्या अमरतिथी उत्सवास शुक्रवारपासून (३० जानेवारी) प्रारंभ होत आहे. यानिमित्त नगर-दौंड रस्त्यावरील अरणगावजवळील मेहेराबाद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी विविध देशांतील मेहेरप्रेमी नगरला आले आहेत. हा उत्सव १ फेब्रुवारीपर्यंत चालेल.
मेहेराबादच्या टेकडीवर तीन दिवस आंतरराष्ट्रीय संमेलनच भरणार आहे. या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात अमेरिका, इराण, चीन, फ्रान्स, रशिया, अर्जेंटिना, इटली, इंग्लंडहून आलेले कलावंत सहभागी होतील. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांबरोबर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांतील भाविक मोठ्या प्रमाणावर मेहेराबादला आले आहेत. विविध भाषांमधून सादर होणाऱ्या प्रार्थना, गीते, भजने, तसेच नृत्य-नाटिकांमुळे या परिसरात उत्सवी वातावरण अाहे. मेहेरबाबांच्या जीवनावरील चित्रफिती यावेळी दाखवण्यात येतील.
परगावहून येणाऱ्या भाविकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. मेहेरप्रेमींसाठी उत्तर व दक्षिण भारतीय पदार्थांची उपाहारगृहे थाटण्यात आली आहेत. याशिवाय फुले, प्रसाद, पुस्तके, सीडी आदी वस्तूंचे स्टॉलही परिसरात आहेत. दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मेहेरबाबांच्या समाधीचे दर्शन प्रत्येकाला शांततेत घेता येईल.

नगरकरांनी उत्सवात सहभागी व्हावे...
^३१ जानेवारी १९६९ रोजी अवतार मेहेरबाबांनी देहत्याग केला. त्यांना भावांजली वाहण्यासाठी ३१ जानेवारीला दुपारी १२ वाजता मेहेराबाद येथे १५ मिनिटे मौन पाळले जाते. मेहेरबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी जगभरातून लोक येतात. मेहेराबाद हे नगरपासून केवळ ६ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नगरकरांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.''
मधुकर डाडर, सचिव, नगर मेहेर केंद्र.