आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन- अमेरिका व इराण यांच्या संबंधातील 34 वर्षांची दरी दूर झाली आहे. दुरावलेल्या संबंधाला नव्याने जोडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी नाट्यमय पुढाकार घेतला. ओबामा यांनी फोनवरून इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्याशी संवाद साधला. दोन्ही देशातील तीन दशकांतील हे पहिलेच मैत्रीपूर्ण संभाषण असून यातून पश्चिम आशियातील नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. संभाषण 15 मिनिटे चालले.
अहमदीनेजाद यांच्या काळात इराणसोबत इराण-अमेरिका यांच्यात विस्तवदेखील आडवा जात नव्हता. दोन्ही देशांत दीर्घकाळ तणावाचे संबंध राहिले होते. या पार्श्वभूमीवर नवीन राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी मात्र अमेरिकेशी सख्य निर्माण करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. त्याला अमेरिकेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शनिवारी सकाळी ओबामा यांनी घाईघाईने रुहानी यांना फोन लावला. फोनवरील संभाषणाची माहिती खुद्द ओबामा यांनीच घाईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली. रुहानींशी आताच चर्चा झाली. इराणमधील अणू प्रकल्पविषयक करारावर आम्ही विचारविनिमय केला. न्यूयॉर्कमध्ये ज्या मुद्दय़ांवर चर्चा झाली. त्याचा आढावा या चर्चेतून घेतला. अणुकार्यक्रमासंबंधी निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल, याची मला खात्री आहे, असे ओबामा यांनी सांगितले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर लगेच त्यांनी रुहानींना फोन लावला होता.
रुहानींच्या गाडीवर बूट फेकला, दगडफेकही
ओबामा यांच्याशी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेशी सख्य करण्याच्या प्रयत्नावर इराणमध्ये संमिर्श प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांचे शनिवारी तेहरानमध्ये आगमन झाले तेव्हा कट्टरवाद्यांनी त्यांच्या कारवर बूट फेकला. रुहानींच्या कारचा ताफा जात असताना 60 कट्टरवादी कार्यकर्त्यांनी ‘डेथ टू अमेरिका ’, ‘डेथ टू इस्रायल ’ अशी घोषणाबाजी केली. काही ठिकाणी दगडफेकही झाली. दुसरीकडे अनेक भागात त्यांचे जोरदार स्वागत झाले. त्यांच्या सर्मथकांनी त्यांच्या आगमनाच्या मार्गावर ‘थँक यू रुहानी’ असे फलक लावले होते.
हसन रुहानी म्हणाले, अमेरिका ग्रेट !
इराण व अमेरिका यांच्यातील कटुतेचे रूपांतर मैत्रीपूर्ण होत असल्याचे चित्र दिसत आहे. रुहानी यांनी अमेरिकेचे गोडवे गाण्यास सुरुवात केली असून अमेरिका महान देश असल्याचे म्हटले आहे. शनिवारी फोनवरील संभाषणानंतर रुहानी यांनी ट्विटरवर मित्र ओबामांचा ‘हॅव अ नाइस डे’ असा निरोप घेतला. त्यावर ओबामा तरी गप्प कसे बसतील? त्यांनी इराणी अंदाज दाखवत ‘खुदाहाफिज’ असा शब्द पोस्ट केला.
भारताचा तेल आयातीचा मुद्दा सोडवण्याचे आश्वासन
अणुकार्यक्रम बंद करण्यासाठी अमेरिकेने इराणवर निर्बंध टाकले होते. या दबावामध्ये भारतानेही अमेरिकेला साथ दिली. सरलेल्या मार्चपर्यंत भारताने इराणमधील तेल आयातीमध्ये 26 टक्क्यांनी घट केली होती, परंतु आता चित्र बदलू लागले आहे. त्यामुळे आयातीचा मुद्दा सोडवण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.