आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल-कायदाच्या धमकीने हादरलेल्या अमेरिकेने पाकिस्तानातील दूतावास केले खाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर / वॉशिंग्टन - अल-कायदाच्या धमकीने अमेरिका अजूनही हादरलेली आहे. त्यामुळेच अमेरिकेने शुक्रवारी पाकिस्तानाच्या लाहोरमधील आपले दूतावास तत्काळ खाली केले. आपल्या कर्मचा-यांना इमारतीमधून हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर तूर्त पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्लाही देशाने आपल्या नागरिकांना दिला आहे.
अल-कायदाने जगभरात हल्ले करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकी सरकारने लाहोरमधील दूतावास अधिका-यांना कार्यालय तात्पुरते बंद करण्याची सूचना केली आहे. लाहोरच्या वकिलातीला दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाणार आहे, अशी खात्रीशीर माहिती आमच्या हाती लागली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. पुढील आठवड्यात दूतावासाचे कामकाज नव्याने सुरू होऊ शकते. लाहोरमध्ये तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. लष्कर तसेच परदेशी पर्यटकांवर लक्ष्य केले जाऊ शकते. आम्ही हा हल्ला परतवून लावण्यासाठी इतर संस्थांची मदत घेत आहोत, असे एका पोलिस अधिका-याने सांगितले. दुसरीकडे पाकिस्तानचा दौ-यावर जाणार असल्यास तूर्त तो रद्द करण्याचा सल्ला अमेरिकी सरकारने आपल्या नागरिकांना दिला आहे. पाकिस्तान प्रवास करणे सध्या तरी टाळावे. अनेक भागात दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


कर्मचारी चंबुगबाळे गुंडाळून इस्लामाबादला
अमेरिकेचे दूतावास कार्यालयातील कर्मचारी जिवाच्या भीतीने लाहोरमधून इस्लामाबादला रवाना झाले आहेत. क्वेट्टातील स्फोटानंतर लाहोर पोलिसांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारच्या हल्ल्यात 30 पोलिसांचा मृत्यू झाला होता.


हेरगिरीचे पुन्हा समर्थन
इंटरनेट आणि फोनच्या माध्यमातून जगभरात निगराणी व हेरगिरी करण्याचे अमेरिकेने समर्थन केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून (एनएसए) अशा प्रकारचे परीक्षण केले जात आहे. परंतु जगाच्या तुलनेत त्याचे प्रमाण अल्प आहे. फोनच्या माध्यमातून केवळ दहशतवादाशी संबंधित संभाषणाचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे त्यात गैर नाही, असे ओबामा प्रशासनाने म्हटले आहे.


मुख्य शहरांत सुरक्षा कडक
तालिबानकडून हल्ले होण्याचा धोका लक्षात घेऊन पाकिस्तानने देशातील महत्वाच्या शहरांत सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. अमेरिकी नागरिक तसेच पाश्चात्य पर्यटकांवर हल्ले करण्यासाठी दहशतवादी गटाकडून संधीची प्रतीक्षा केली जात आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. लाहोर हा लष्कर-ए-तोयबाचे वर्चस्व असलेला प्रदेश आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


पाकिस्तानात ईदच्या दिवशी नमाजच्या वेळी हल्ला, 9 ठार
क्वेट्टातील घटना ताजी असतानाच ऐन ईदच्या दिवशी हेच शहर शुक्रवारी पुन्हा हिंसाचारामुळे हादरले. कराचीतील एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या गोळीबारात 9 जण ठार 20 जखमी झाले. शहराच्या पूर्वेला असलेल्या मशिदीमधून भाविक बाहेर येत असतानाच बंदूकधा-यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. गुरुवारी याच शहरातील आत्मघाती हल्ल्यात किमान 38 जण ठार झाले होते.