काबूल/ वॉशिंग्टन - अमेरिकेने तालिबानच्या तीन दहशतवाद्यांना पाककडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तिन्ही दहशतवादी तालिबानच्या मास्टर माइंडपैकी आहेत. यापैकी एक दहशतवादी तालिबानचा क्रमांक दोनचा वरिष्ठ कमांडर आहे. याला अमेरिकेने अफगाणिस्तानात ताब्यात घेतले होते.
तालिबानचे म्होरके : तालिबानचा अति महत्त्वाचा कमांडर लतीफ महसूद याला ऑक्टोबर २०१३ मध्ये एका विशेष मोहिमेअंतर्गत अमेरिकेने ताब्यात घेतले होते. लतीफ हा तालिबानी चीफ हकिमुल्ला महसूदचा अत्यंत विश्वासार्ह म्हणून आेळखला जातो. या मोहिमेवर तत्कालीन अफगाणी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाइ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याला अत्यंत गुप्तरीत्या पाककडे सुपूर्द करण्यात आले असल्याचे पाकच्या संरक्षण सूत्रांनी सांगितले. तालिबानच्या जफर व अजीज या दोघांनाही पाकच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेने तीन कैद्यांना पाकिस्तानला सोपवल्याचे म्हटले असून नावे जाहीर करण्यास नकार दिला आहे.