वॉशिंग्टन - भारतातील १०० स्मार्ट शहरांच्या विकास कार्यक्रमाला गती देण्याच्या योजनेअंतर्गत अमेरिका भारतातील तीन शहरांच्या विकासात मदत करणार आहे. याबरोबर भारतातील ५०० शहरांतील नागरी संस्था आणि स्थानिक प्रशासनाबरोबर संयुक्तरीत्या शुद्ध पेयजल आणि मलनिस्सारण योजनेत सहकार्य करणार आहे. अमेरिका अहमदाबाद, अजमेर आणि विशाखापट्टनम या शहरांच्या विकासात योगदान देईल.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यात मंगळवारी झालेल्या शिखर बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. भारत सरकारने १०० स्मार्ट शहरांची योजना आखली आहे. यासाठी अर्थसंकल्पात ७०६० कोटी रुपये तरतुदीचा प्रस्ताव आहे. २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले होते, पंतप्रधान १०० शहरांचा विकास करू इच्छित आहेत.
आम्ही रॉकस्टारसारखे स्वागत
करू शकत नव्हतो : केरी
अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या फॉगी बॉटम मुख्यालयात परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पंतप्रधान मोदी यांना स्नेहभोजन दिले. या वेळी ते म्हणाले, आम्ही िकतीही स्वागत केले तरी न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअरमध्ये जसे रॉकस्टारसारखे स्वागत झाले तसे करू शकत नाही. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे टीव्हीवरील व वृत्तपत्रांतील वार्तांकन पाहिले नाही असा आमच्यापैकी एकही नव्हता. पीआयओ कार्डधारकांना आजीवन व्हिसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी भारतात परतण्याआधीच झाली आहे. त्यांनी पर्सन ऑफ इंडियन ओरिजन(पीआयओ) कार्डधारक भारतीय वंशाच्या व्यक्तींना आजीवन व्हिसा देण्याची घोषणा केली होती. त्यांना भारतातील पोलिस ठाण्यात नोंदणी व वास्तव्याची माहिती देण्यापासून सूट देण्यात येईल. पंतप्रधानांनी २८ सप्टेंबर रोजी मेडिसन स्क्वेअरमध्ये ही घोषणा केली होती. सरकारने बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी केली.
भारत-अमेरिका सागरी वाहतूक सुरक्षा वाढवणार
चीन आणि जपानमध्ये दक्षिण सागरातील बेटांवरील वर्चस्वाचा वाद ताजा आहे. चीनच्या या सागरी महत्त्वाकांक्षेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेने सागरी वाहतूक सुरक्षेत वाढ करण्याचे ठरवले आहे. दोन्ही देशांनी भारतीय नौदलाच्या तंत्रज्ञान सहकार्य वाढीवर विचार केला. यामध्ये तांत्रिक सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रातील आढावा घेतला जाणार आहे.
पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी केली
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत
आपल्या भाषणामध्ये भारतातील आधीच्या सरकारांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी पंतप्रधानपदाचीही प्रतिष्ठा कमी केली. त्यांनी दौरा प्रायोजित कार्यक्रम बनवला. त्यांचा हा वैयक्तिक नव्हे, तर पंतप्रधानांचा दौरा होता. कार्यक्रम आयोजनाचा पैसा कोठून आला ते मोदी आणि भाजपने सांगावे. आनंद शर्मा, काँग्रेसचे प्रवक्ते
दौरा यशस्वी व ऐतिहासिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत भारतीय संस्कार व संस्कृतीचे प्रदर्शन केले. यामुळे देशात सन्मानाची भावना आहे. संपूर्ण दौरा पूर्ण यशस्वी व ऐतिहासिक झाला.
मुख्तार अब्बास नक्वी, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष