आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Provided Weapons To Syrian Revoltors Against Asad Government

असद सरकारविरूध्‍द लढण्‍यासाठी सिरियन बंडखोरांना अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सिरियाप्रकरणी रशियासोबत शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू करतानाच असाद सरकारविरुद्ध लढण्यासाठी बंडखोरांना अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र पुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शस्त्रास्त्रांनी भरलेली जहाजे सिरियात दाखल होत आहेत. शिवाय ओबामा प्रशासनाद्वारे वाहने भरभरून युद्ध साहित्य पाठवले जात आहे.


कमी मारक क्षमता असलेली शस्त्रे, दारूगोळा, प्राणघातक नसलेली युद्धसामग्री, वाहने, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि युद्धात लागणा-या मेडिकल किट्स यांचा लष्करी मदतीत समावेश आहे. या युद्धसाहित्य व शस्त्रास्त्र पुरवठ्यामुळे असाद सरकारविरोधात लढणा-या बंडखोरांना पाठबळ मिळेल, असे अमेरिकी अधिका-यांना वाटत आहे. अमेरिकेतील आघाडीचे दैनिक ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने हे वृत्त दिले आहे. शस्त्रास्त्र पुरवठ्याबद्दल सीआयए व अमेरिकी सरकारने गुप्तता पाळली होती. ही शस्त्रास्त्रे अमेरिकी बनावटीची नाहीत. मात्र, सीआयएने त्यासाठी आपला पैसा व स्रोत वापरला असल्याचे एका अमेरिकी अधिका-याने सांगितले. तत्पूर्वी, सिरियातील असाद विरोधकांची मदत वाढवण्यात आली असल्याचे वक्तव्य व्हाइट हाऊसचे जनसंपर्क सचिव जे कार्नी यांनीही केले होते.


शस्त्रास्त्र पुरवठा बेताचाच
अमेरिकेच्या शस्त्रास्त्र पुरवठ्याबद्दल असादविरोधी आघाडीने स्वागत केले; परंतु हा शस्त्रास्त्र पुरवठा बेताचाच आहे. अद्याप मोठी लढाई बाकी आहे. असाद यांच्या लष्कराला रशिया व इराणकडून मिळणा-या लष्करी मदतीच्या तुलनेत हा शस्त्रास्त्र पुरवठा अत्यंत तोकडा आहे, असे मत विरोधी आघाडीचे प्रवक्ते खालेद सालेह यांनी व्यक्त केले.


संयुक्त राष्ट्रातही खलबते
न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयातही सध्या सिरिया मुद्द्यावरून खलबते सुरू आहेत. रासायनिक अस्त्रांचा साठा ताब्यात घेऊन तो नष्ट करण्यासाठी सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्या प्रस्तावातील मुद्दे काय असावेत, याबाबत चर्चा सुरू आहे.


जॉन केरी- लाव्हारोव चर्चा
रशियाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी व्हाइट हाऊस व संरक्षण मंत्रालयातील अधिका-यांच्या शिष्टमंडळासह जीनिव्हाकडे रवाना झाले आहेत. ते रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हारोव यांची भेट घेणार आहेत. सिरियातील रासायनिक शस्त्रास्त्रांचा तपशील, त्यांची ठिकाणे, ताब्यात घेण्यासाठीची योजना आदींबाबत उभय नेत्यांच्या भेटीत चर्चा करण्यात येईल. अर्थात योजना तयार करणे व त्याची अंमलबजावणीसाठी कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही.