वॉशिंग्टन - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन
दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी भारताला अमेरिकेकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. दाऊद १९९३ च्या मुंबई बॉम्बहल्ल्याचा मास्टरमाइंड असून तो भारतात मोस्ट वाँटेड आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या आग्रहावरून अमेरिकेने पहिल्यांदाच दाऊदच्या डी. कंपनीचाही दहशतवादी नेटवर्कच्या यादीत समावेश केला आहे. या यादीत जैश-ए-मुहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हक्कानी नेटवर्क या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा यापूर्वीच समावेश आहे. आता भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी दहशतवादी नेटवर्कची सुरक्षित स्थळे नष्ट करण्यासाठी संयुक्त आणि संघटित प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे.
मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात मंगळवारी झालेल्या शिखर परिषदेत हा निर्णय झाला. दरम्यान, पश्चिम आशियातील आयएसआयएस या दहशतवादी संघटनेविरोधातील संघर्षात भारत सहभागी होणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. मात्र, या मुद्द्यावर अमेरिकेशी सहकार्य करण्याचे वचनही भारताने दिले आहे.