आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Say, Be Aware If You Give Sellter To Sonwden Then Face Action

अमेरिका म्हणते, खबरदार! स्नोडेनला आश्रय द्याल तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेची हेरगिरी चव्हाट्यावर आणणा-या एडवर्ड स्नोडेनने इक्वेडोरकडे राजाश्रयाची विनंती केली आहे. परंतु स्नोडेनला जो देश आश्रय देईल, त्याला वाईट परिणामांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा बिथरलेल्या अमेरिकेने दिला आहे. रशियाने स्नोडेनला आमच्या ताब्यात द्यावे, असे स्पष्ट करतानाच चीन, क्युबासह अन्य काही देशांनी त्याला कसलीही मदत करू नये, असे अमेरिकेने बजावले आहे.


रविवारी रात्री मॉस्कोहून दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरच्या दिशेने जाणा-या स्नोडेनच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो क्युबामार्गे जाऊ शकतो. परंतु तो हवानाला रवाना झाल्याचेही एक वृत्त आहे. सायंकाळी मात्र त्याचे क्युबाचे विमान हुकल्याचे वृत्त आले आहे. सीट क्र. 17- ए या क्युबाकडे जाणा-या विमानातील आसनावर जगभरातील पत्रकारांच्या नजरा होत्या. परंतु स्नोडेनला सोमवारी विमान गाठता आले नाही. एकूणच, तो मॉस्कोहून नेमका कोणत्या दिशेने जाणार आहे, याचा थांगपत्ता अमेरिकेला अद्याप लागलेला नाही, परंतु कोणत्याही परिस्थितीत स्नोडेनला पकडण्याचा चंग अमेरिकेने बांधला आहे. त्यासाठी मुत्सद्देगिरी, कायदा अशा सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. त्याला इक्वेडोरमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रकारचे अडथळे आणले जात आहेत. त्यासाठी दबाव वाढवण्यात येत आहे, असे एका अधिका-याकडून स्पष्ट झाले आहे. स्नोडेनवर गंभीर स्वरूपाचे आरोप असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी संबंधित देशांना सूचना करण्यात आली आहे. हाँगकाँगसोबत गुन्हेगार हस्तांतरण करार असतानाही त्रुटी काढून स्नोडेनला पळून जाण्यासाठी हाँगकाँगने वॉरंट फेटाळले. यामागे चीन असले पाहिजे, असा संशय सिनेटर डिएन फिनस्टीन यांनी व्यक्त केला आहे.

स्नोडेनच्या विनंतीवर विचार सुरू : इक्वेडोर
स्नोडेनने राजाश्रयासाठी विनंती केल्याच्या वृत्ताला इक्वेडोरचे परराष्ट्रमंत्री रिकार्डाे पॅटिनो यांनी दुजोरा दिला. ते सोमवारी हनोई येथे पत्रकारांशी बोलत होते. जगभरातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करण्याची विनंती स्नोडेनकडून करण्यात आली आहे, अशी माहिती पॅटिनो यांनी दिली आहे. तो मॉस्कोमध्ये आहे. आम्ही उच्च्स्तरीय अधिका-यांच्या संपर्कात आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.


इक्वेडोरमध्येच का ?
दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरमध्ये डाव्या पक्षाची सत्ता आहे. राष्ट्राध्यक्ष राफेल कॉरिआ यांनी विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांझ यांनाही आश्रय दिला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना अनेक
देशांच्या माहितीचा भंडाफोड केला. तो स्वीडनला हवा आहे.


स्नोडेनला पळवण्यामागे चीन
एडवर्ड स्नोडेनला हाँगकाँगमधून पळून जाण्यासाठी चीनकडून मदत मिळाली असावी, असा संशय स्नोडेनचे हाँगकाँगमधील वकील अल्बर्ट हो यांनी व्यक्त केला आहे. या घडामोडींमागे चीनचा हात आहे, परंतु अमेरिकेसोबतच्या संबंधांत कटुता येऊ नये म्हणून चीनने पडद्यामागून हालचाली सुरू ठेवल्या आहेत, असे हो यांना वाटते.


काय आहे प्रकरण?
एनएसएचा माजी काँट्रॅक्टर स्नोडेन रविवारी हाँगकाँगमधून रशियात दाखल झाला. दरम्यान, हेरगिरी आणि सरकारी दस्तऐवजांची चोरी करण्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला असून त्याच्यावर आरोप निश्चित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर स्नोडेनने पळ काढला आहे.