वॉशिंग्टन - दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी अमेरिकेने पुन्हा एकदा इराकला युद्धभूमी बनवण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून इराककडे डझनावर क्षेपणास्त्रे रवाना करण्यात आली आहेत. त्यामुळे मध्य-पूर्व प्रदेशात तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या आठवड्यात क्षेपणास्त्रांना इराकमधील लढाईसाठी पाठवल्याचे इराकी अधिकार्यांनी सांगितले. सिरिया सीमेवर अनबर प्रांतात अल-कायदाचे अतिरेकी सक्रिय आहेत. त्यांच्याकडून प्रदेशात हिंसाचार घडवण्यात येत असल्याने ही संभाव्य कारवाईसाठी शस्त्रसज्जता ठेवण्यात येत असल्याचे अमेरिकी सूत्रांनी सांगितले.
दोन्ही देशांत त्यादृष्टीने करार झाला आहे. त्यानुसार हेलफायर प्रकारातील क्षेपणास्त्रे पाठवण्यात आल्याचे गुरुवारी जाहीर केल्याचे अमेरिकेच्या परदेशी विभागाचे प्रवक्ते जेन पास्की यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांत 2008 मध्ये सदर करार झाला होता. सामरिक करारानुसार अमेरिका इराकला दहशतवादाच्या विरोधातील लढाईत सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे.
असा होणार वापर
दहशतवादी उच्चटनासाठी अमेरिका जहाजांची मदत घेणार आहे. अल-कायदाचा अड्डा लक्ष्य करण्यासाठी जहाजातून क्षेपणास्त्रांचा मारा केलप जाईल. त्याचा वापर इराकी लष्कराकडून केला जाईल. दहशतवाद्यांचे तळ, वाहनांना लक्ष्य केले जाणार आहे.
‘अनबर’वर पकड
गेल्या काही महिन्यांपासून अल-कायदाने अनबर प्रदेशावर आपली पकड मजबूत केली आहे. शेजारी सिरियामध्ये जाऊन दडून बसणेही दहशतवाद्यांसाठी सहज शक्य असल्याने दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.
पुढील वर्षी नवीन कुमक
अमेरिकेने अल-कायदा कोंडीत पकडण्यासाठी पुढील वर्षी मानवरहित विमानांचा ताफा पाठवण्याचे ठरवले आहे. त्यात टोही विमानांचा समावेश असेल.
खासदाराच्या घरावर हल्ला, भावासह 5 सैनिकांची हत्या
रमादी । बंडखोरांच्या गटात सक्रिय असलेल्या अहमद अल-अलवानी या इराकी खासदाराला शनिवारी सुरक्षा दलाने अटक केली. एका हल्ल्यात अलवानी यांचे बंधू आणि 5 जवान ठार झाले. त्या अगोदर सुरक्षा दलाने त्यांच्या घरावर हल्लाबोल केला होता. स्वयंचलित शस्त्रांचा हल्ला त्यांच्या घरावर केला गेला. त्यात अन्य 18 जवानही जखमी झाले. अलवानी यांना नेमके कोणत्या कारणाने अटक झाली, हे मात्र स्पष्ट झाले नाही. परंतु हल्ल्याच्या घटनेला सरकारी सूत्रांनी दुजोरा दिला. दरम्यान, अलवानी यांच्यावर दहशतवाद्यांना पाठींबा दिल्याचा आरोप आहे.