आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका चक्क स्वत:च्या भूमीत , नव्हेतर चंद्रावर राष्ट्रीय उद्यान थाटणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकी खासदारांची देशासाठी अभिमान ठरेल असे नवीन भव्यदिव्य राष्ट्रीय उद्यान उभारण्याची योजना आहे. परंतु हे राष्ट्रीय उद्यान अमेरिकेच्या कुठल्याही राज्यात नाही, तर ते चक्क जगाबाहेर चांद्रभूमीवर असणार आहे.
अमेरिकेचे अपोलो हे चांद्रयान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले होते तेथे राष्ट्रीय इतिहास उद्यान उभारण्याची योजना असलेले एक विधेयक अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात सादर करण्यात आले आहे. अपोलो चांद्रागमन वारसा अधिनियम हे विधेयक विज्ञान, अंतराळ आणि तंत्रज्ञान समितीबरोबरच नैसर्गिक संसाधन समितीकडे विचारासाठी पाठवण्यात आले आहे.


अपोलो चांद्र मोहीम कार्यक्रम ही अमेरिकेच्या इतिहासातील एक सर्वाधिक अभिमानास्पद उपलब्धी आहे. त्यामुळे व्यावसायिक आस्थापना आणि परदेशी नागरिकांना चंद्रावर पाऊल ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे या विधेयकात म्हटले आहे. हे विधेयक अस्तित्वात आल्यानंतर वर्षभराच्या आत अपोलो यान उतरले होते त्या ठिकाणी
राष्ट्रीय इतिहास उद्यान उभारण्यात यावे, असेही त्यात नमूद केले आहे. या उद्यानामुळे त्या जागेचे संवर्धन केले जाऊन अमेरिकेची ही ऐतिहासिक उपलब्धी जगाच्या चिरकाल स्मरणात राहील. अपोलो चांद्रयान, त्यावरील उपकरणे आणि अंतराळवीरांनी 1969 ते 1972 दरम्यान चांद्रभूमीवर जेथे जेथे स्पर्श केला त्या सर्व जागेला अपोलो चांद्रागमन भूमी संबोधण्यात आले आहे.