आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियावर हल्ला करण्‍याच्या तयारित अमेरिका , क्षेपणास्त्र डागण्याची प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - संयुक्त राष्ट्राचा अहवाल येण्यापूर्वीच अमेरिका,ब्रिटन,फ्रान्स यांनी सिरीयातील बशर अल असाद सरकारवर रासायनिक हल्ल्याचा ठपका ठेवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या डोक्यात सिरियावर मर्यादित प्रमाणात लष्करी कारवाई करण्याचा विचार घोळत आहे. टॉमहॉक क्रुझ क्षेपणास्राने सज्ज चार युद्धनौका भूमध्य सागरात तैनात असून अमेरिकी नौदल केवळ ओबामा यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. सिरियावर हल्ला केल्यास ‘महासंकट’ ओढवेल असा गंभीर इशारा रशियाने दिला आहे.तर संयुक्त राष्ट्राची चौकशी पूर्ण होण्याआधीच पाश्चात्य देश सिरिया सरकारवर आरोप करीत आहेत अशी टीका चीनने केली आहे.


सिरियातील रासायनिक हल्ल्यात असाद सरकारचा हात नाही असे परराष्ट्रमंत्री वालीद मुल्लेम यांनी मंगळवारी निक्षून सांगितले. आपल्याच जनतेचे आयुष्य पूर्णपणे उदध्वस्त होईल असे शस्त्र जगातील कोणताही देश वापरत नाही अशा शब्दांत मुल्लेम यांनी रासायनिक हल्ल्याचा अमेरिकेचा आरोप फेटाळला. रासायनिक हल्ल्यामागे असाद सरकारचाच हात असल्याचा आरोप सोमवारी अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी केला होता.ब्रिटन आणि फ्रान्सने यापूर्वीच हल्ल्यामागे असाद सरकार असल्याचा आरोप केला आहे.


तीन दिवसांची कारवाई
सिरियातील लष्करी ठिकाणांवर समुद्रातून क्रुझ क्षेपणास्त्र डागणे अथवा लढाऊ बॉम्बवर्षाव करण्याची अमेरिकेची योजना आहे. ही लष्करी कारवाई दोन ते तीन दिवसांत आटोपण्याचे घाटत आहे. इराक, अफगणिस्तानमध्ये हात पोळल्याने सिरिया युद्धात गुंतून पडण्याचा ओबामांचा विचार नाही. केवळ रासायनिक हल्ल्याबद्दल ‘शिक्षा’ करण्याचा इरादा आहे.


टीमकडून तपासणी
सिरियातील रासायनिक हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची मंगळवारी संयुक्त राष्टÑाच्या तज्ज्ञ समितीने तपासणी केली. तीन ठिकाणी चमूने भेट दिली. दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्यात 355 ठार झाले, तर साडेतीन हजार नागरिक जखमी झाले आहेत.


हल्ल्याचे टायमिंग असे ठरणार
रासायनिक हल्यातील सिरिया सरकारची नेमकी भूमिका काय आहे,याची गुप्तचरांकडून माहिती
दोस्त राष्ट्र व अमेरिकी काँग्रेस सदस्यांची चर्चा
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कारवाईची व्याप्ती ठरवणार


आंतरराष्‍ट्रीय खलबते
सिरियातील लष्करी कारवाईवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर खलबते सुरू आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान केव्हिन रड यांच्याशी तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन व ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी एकमेकांशी चर्चा केली.


संयुक्त राष्ट्रात दोन गट
लष्करी कारवाई करण्यावरून दोन गट पडले आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया सारखी पाश्चात्य राष्ट्रे एका गटात तर रशिया, चीन दुस-या गटात आहे. रशिया, चीनने लष्करी कारवाईस विरोध केला आहे. इराणनेही दोन दिवसांपूर्वी अमेरिकेला या मुद्द्यावर इशारा दिला होता.


हल्ल्याचा अद्याप पुरावा नाही
रासायनिक हल्ल्याचा अद्याप पुरावा हाती लागलेला नाही.झाला असल्यास त्याला कोण जबाबदार आहे तेही स्पष्ट झालेले नाही.’’ -ब्लादीमीर पुतीन, राष्ट्राध्यक्ष,रशिया
हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या पथकाला सिरियात लवकर प्रवेश देण्यात आला नाही. म्हणजेच ते काही तरी दडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.’’
डेव्हिड कॅमेरॉन, पंतप्रधान, ब्रिटन