आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Warned Pakistan, If Attacking On India, It Will Be Bad Result

खबरदार! भारतावर हल्ले कराल तर; ओबामांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पाकला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन/ नवी दिल्ली - अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-याच्या वेळी भारतात कोणत्याही स्वरूपाचा अतिरेकी हल्ला होऊ नये, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा दिल्लीत होणा-या २६ जानेवारीच्या संचलन समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्या दौ-यामुळे अमेरिकन आणि भारतीय सुरक्षा संस्था अतिरिक्त सतर्कता बाळगत आहेत. यापूर्वी पाकिस्तानमधील अतिरेक्यांनी अमेरिकन नेत्यांच्या भारत दौ-यादरम्यान अतिरेकी हल्ले केले आहेत. त्यामुळेच पाकिस्तानला इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानमधील अमेरिकन दूतावासाला सतर्क करण्यात आले आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकन फौजाही अतिरेकी संघटनांवर नजर ठेवून आहेत. भारत आणि अमेरिकन गुप्तचर संस्था दर मिनिटाची माहिती परस्परांना देत आहेत.

ओबामांसाठी दिल्लीत सातस्तरीय सुरक्षा
ओबामांसाठी प्रजासत्ताक दिन समारंभात दिल्लीत जमिनीपासून आकाशापर्यंत सात स्तरांची सुरक्षा व्यवस्था राहील. सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे ८० हजार जवान तैनात राहतील. निमलष्करी दलांचे २० हजार जवानही तैनात करण्यात येतील. ओबामांच्या सर्वांत जवळच्या सर्कलची जबाबदारी अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसकडे असेल.

ओबामा प्रथमच दोन तास खुल्या मैदानात
प्रजासत्ताक दिन समारंभाच्या वेळी ओबामा राजपथावर तब्बल दोन तास खुल्या जागेवर बसणार असल्याने अमेरिकी आणि भारतीय सुरक्षा संस्था अतिरिक्त खबरदारी घेत आहेत.

१५००० सीसीटीव्ही
सुरक्षेसाठी राजधानीत १५००० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून नियंत्रण कक्षामध्ये भारताच्या बरोबरीने अमेरिकी सुरक्षा दलाचे जवानही डोळ्यात तेल घालून निगराणी ठेवणार आहेत.

खबरदारी का ?
मार्च २००० मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन भारतात आले त्या वेळी २० मार्चला अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानी अतिरेक्यांनी ३६ शिखांची हत्या केली होती.

फेस रीडर कॅमेरे
राजपथाभोवतीच्या परिसरात दिल्ली पोलिस पहिल्यांदाच चेहरेपट्टी ओळखणारे (फेस रिकग्निशन) कॅमेरे बसवत आहेत. त्यामुळे राष्ट्रविरोधी किंवा गुन्हेगारांची वेळीच ओळख पटवता येणार आहे.

दिल्लीत हजार काडतुसांसह तिघे पकडले
दिल्लीच्या वेलकम मेट्रो स्थानकाजवळ पोलिसांनी मोहंमद इम्रान, मोहंमद शरीक व फहीम मियाँ या तीन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून एक हजार जिवंत काडतुसे जप्त केली. त्यांचे अतिरेक्यांशी संबंध असल्याची माहिती नसली तरी एवढी काडतुसे मिळणे हा अतिरेकी कटाचा संकेत आहे.