फोटो : 25 सप्टेंबरला अमेरिकेला रवाना होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
वॉशिंगटन -
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला पोहचण्याच्या काही मिनिटांपूर्वी न्यूयॉर्कच्या एका न्यायालयाने त्यांच्या विरोधात समन्स जारी केले आहे. 2002 च्या गुजरात दंगल प्रकरणी मुख्यमंत्री म्हणून मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं या समन्सच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार मोदींना 21 दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे. ठरलेल्या वेळेत उत्तर दिले नाही तर मोदींच्या विरोधात 'डिफॉल्ट जजमेंट' चा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
मोदींच्या विरोधात याचिका
न्यूयॉर्क च्या सदर्न डिस्ट्रिक्टमधील न्यायालयाने अमेरिकन जस्टिस सेंटर (एजेसी) या मानवाधिकार संघटनेच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे समन्स जारी केले आहे. 28 पानांच्या या याचिकेत मोदींवर मानवते विरोधात गुन्हा, हत्या, टॉर्चर आणि दंगलग्रस्तांवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. संघटनेने नरेंद्र मोदी यांच्यावर कारवाई करण्याबरोबरच दंगलग्रस्तांना मोबदला देण्याची मागणीही केली आहे.
उत्तर न दिल्यास होऊ शकते कारवाई
मोदींच्या विरोधात जारी केलेल्या समन्सला त्यांना 21 दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे. नसता 'डिफॉल्ट जजमेंट' चा वापर केला जाईल. अशा खटल्यांमध्ये वेळेत उत्तर न दिल्यास दुस-या पक्षाच्या बाजुने निर्णय दिला जातो.