आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Diplomat Officer Said Against India, My Dog Get Better Food Than Indian Worker

अमेरिकी अधिकार्‍याची भारताविरुद्ध गरळ,‘भारतातील कामगारापेक्षा माझ्या कुत्र्यास चांगले खाद्य मिळते'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्यावरून निर्माण झालेला वाद थांबायचे नाव घेत नाही. देवयानी प्रकरणात भारतातून हकालपट्टी करण्यात आलेल्या अमेरिकी राजनैतिक अधिकारी व त्याच्या पत्नीने भारतीय संस्कृतीबद्दल अपशब्द वापरल्यामुळे नवा वाद पुढे आला आहे. अमेरिकी राजनैतिक अधिकार्‍याने फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारतात बागकाम करणार्‍या कामगारापेक्षा माझ्या कुत्र्यास चांगले खाद्य मिळते.’ संबंधित अधिकारी वेन मे असल्याचे भारतीय प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. वेन यांनी पत्नी एलिशियासह नुकताच भारत सोडला आहे. यानंतर त्यांच्या फेसबुक पेजला भेट दिल्यानंतर भारताबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याचे दिसून आले. 2010 ते 2012 या काळातील टिप्पण्या आहेत. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मेरी हर्फ यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी फेसबुक पोस्ट पाहिले नसल्याचे सांगितले. त्यांचे वक्तव्य कोणत्याही प्रकारे अमेरिकी सरकारचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे त्या म्हणाल्या.
झाले गेले विसरून पुढे चला
भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे प्रकरणावरून भारत आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांत निर्माण झालेला तणाव हलका करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दोन्ही देश झाले गेले विसरून संरक्षण, दहशतवाद आणि नागरी अणू सहकार्याच्या मुद्दय़ावर काम करण्यास सहमत झाले आहेत.
अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री विल्यम जे. बर्न्‍स व भारताचे अमेरिकेतील नवे राजदूत एस. जयशंकर यांच्यात मंगळवारी बैठक झाली. यामध्ये दोन्ही देशांकडून संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला. वातावरण बदल, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, दहशतवाद आणि नागरी आण्विक सहकार्य या मुद्दय़ांवर एकत्र काम करण्यासाठी दोन्ही देशांनी बांधिलकी दर्शवली. राजनैतिक पातळीवर उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दय़ावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
घरकाम करणार्‍या कर्मचार्‍यांना अमेरिकेचे वेतन एक डॉलर
भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी मोलकरणीला कमी वेतन दिल्याचा आरोप अमेरिकेने केला. याप्रकरणी खटलाही दाखल करण्यात आला. मात्र, अमेरिका परदेशात आपल्या राजनैतिक अधिकार्‍यांच्या घरी काम करणार्‍यांना एक डॉलरपेक्षा (61.48 रुपये) कमी रोजगार देत असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकी इन्स्पेक्टर जनरलच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. अमेरिकेने हा अहवाल चुकीचा ठरवला आहे. या अहवालाला आधार नसल्याचे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.