वॉशिंग्टन - अमेरिकेतील अतिशय अटीतटीच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या व्यक्तींचा दबदबा वाढला असून रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या डेमोक्रॅटिक पक्षासाठी हा पराभव जोरदार झटका ठरला आहे. आता रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये बहुमत मिळाले असून प्रतिनिधी सभागृहातही संख्याबळ वाढवण्यात यश आले आहे. त्यामुळे ओबामा यांना शेवटची दोन वर्षे कठीण जातील.
देशभरात सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक मातब्बर पराभूत झाल्याने ही रिपब्लिकन पार्टीची लाट असल्याचे राजकीय पंडितांना वाटते. प्रतिनिधी सभागृहाच्या सर्व ४३५ जागा, सिनेटच्या १०० पैकी ३६ जागा आणि ५० पैकी ३६ राज्यांतील गव्हर्नरपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. ताज्या आकडेवारीनुसार रिपब्लिकनने सिनेटच्या १०० पैकी ५२ जागी विजय मिळवला आहे. डेमोक्रॅटिक पार्टीची सदस्य संख्या ४३ आहे. विद्यमान काँग्रेसमध्ये डेमोक्रॅटिकची संख्या ५३ एवढी आहे. रिपब्लिकन पार्टीचे सदस्य ४५ आहेत. रिपब्लिकन पार्टीला प्रतिनिधी सभागृहात चांगली आघाडी मिळत असल्याचे दुपारपर्यंतचे चित्र होते. पक्ष १० जागांवर आघाडी घेत २३५ जागांवर पुढे असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मात्र डेमोक्रॅटिक पार्टीला ८ जागांवर फटका बसला. १५७ जागांवर आघाडी घेतली आहे. सध्या डेमोक्रॅटिक पक्षाकडे १९९, तर रिपब्लिकनकडे १५७ सदस्य आहेत. म्हणूनच रिपब्लिकनला प्रतिनिधी सभागृहात आघाडी आहे.
आठ वर्षांत पहिल्यांदा
प्रतिनिधी सभागृहात रिपब्लिकन पार्टीला आठ वर्षांत पहिल्यांदाच बहुमत मिळत असल्याचे पाहायला मिळू लागले आहे. त्यामुळेच हा कौल देशाच्या राजकारणात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
भारतीयांचा दबदबा
मध्यावधी निवडणुका सत्ताधारी पक्षाला हादरा देणा-या ठरल्या आहेत; परंतु निवडणुकीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे भारतीयांचा वाढता दबदबा म्हणता येईल. दक्षिण कॅरोलिना गव्हर्नर निक्की हेले, कॅलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल कमला हॅरिस आघाडीवर असून दोन्ही पदांवर िनवडून येण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. रिपब्लिकन हेले (४२) यांनी व्हिन्सेंट शेहिन यांचा पराभव केला. हवाई प्रांतातून तुलसी गबार्ड दुस-यांदा निवडून आल्या आहेत. हॅरिस (५०) दुस-यांदा अॅटर्नी जनरल म्हणून निवडून आल्या. कोलोरॅडोमध्ये रिपब्लिकनचे जनक जोशी विजयी झाले. आेहिआेमध्ये रिपब्लिकनचेच नीरज अंतानी (२३) यांनी डेमोक्रॅटिकचे पॅट्रिक मॉरिस यांचा धक्कादायक पराभव केला. सर्वात कमी वयाच्या विजयी उमेदवारांमध्ये नीरज यांचा समावेश होतो. डॉ. प्रसाद श्रीनिवासन (कनेक्टिकट हाऊस-३१, रिपब्लिकन), सॅम सिंग (मिशिगन हाऊस-६९, डेमोक्रॅटिक), कुमार भार्वे (सभागृह नेता), अरुणा मिलर. वॉशिंग्टन प्रांतातही प्रमिला जयपाल (डेमोक्रॅटिक, सिनेट) यांच्या रूपाने भारतीय वंशाची व्यक्ती विजयी झाली.