वॉशिंग्टन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित अमेरिका दौ-याच्या वेळी त्यांना अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त सत्रात भाषणासाठी आमंत्रित करावे अशी विनंती अमेरिकेच्या दोन संसद सदस्यांनी सभागृहाचे अध्यक्ष जॉन बोएनर यांच्याकडे केली आहे. यासंदस्यांनी तसे पत्रही जॉन यांना लिहिले आहे. बराक ओबामा यांच्या निमंत्रण दिल्याने नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता आहे.
भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा मित्रदेश आहे. राजकीय, आर्थिक किंवा संरक्षण विषयक संबंध असो, सर्व क्षेत्रात संपूर्म दक्षिण आशियामध्ये अमेरिकेसाठी भारत सर्वात महत्त्वाचा देश असल्याचे अमेरिकन काँग्रेसचे सदस्य एड रॉयस आणि जॉर्ज होल्डींग यांनी अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. शुक्रवारीच त्यांनी हे पत्र सभापतींना दिले. एकविसाव्या शतकात भारत आणि अमेरिकेतील संबंध हे अत्यंत महत्त्वाचे असतील या ओबामांच्या वक्व्याचा धागा धरूनच या सदस्यांनी पत्र लिहिले आहे.
मोदी यांनी खासगी गुंतवणूक, प्रशासकीय कामात गती आणणे आणि महत्त्वाच्या देशांबरोबर औद्योगिक संबंध दृढ करण्याचे वक्तव्य केलेल आहे. त्यामुळे अमेरिकेने त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करणे गरजेचे अशल्याचे या दोघांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. 2001 नंतर भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पण तसे अशले तरी अद्याप अपेक्षेपेक्षा बरेच मागे असल्याचे या दोघांचे म्हणणे आहे.
रिपलब्लिकन पक्षाचे सदस्य असणारे रॉयस हे अमेरिकेच्या परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष आहेत. मोदी यांना काही सदस्यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळेच गुजरात दंगलींनंतर त्यांना व्हीसा देण्यावरून मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. पण आता अमेरिकेचेच संसद सदस्य मोदींना अमेरिकेच्या संसदेत भाषणासाठी बोलावण्याची मागणी करत आहेत.