आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी वृत्तपत्राकडून भारताचे कौतुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- काही समस्या निर्माण झाल्यानंतर योग्य तो बदल घडवण्यासाठी भारतातील राजकीय व्यवस्था प्रतिसाद देणारी आहे, अशा शब्दांत अमेरिकी वृत्तपत्राकडून भारताबद्दल प्रशंसोद्गार काढण्यात आले आहेत. ही बाब चीन किंवा रशियात पाहायला मिळत नसल्याचे निरीक्षणही वृत्तपत्राने नोंदवले आहे.

द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात प्रकाशित संपादकीय मजकुरात दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तातडीने काही बदल करण्याची गरज होती. त्यानुसार सरकारने त्याला योग्य प्रतिसाद दिला. त्यातून देशातील राजकीय व्यवस्था तातडीच्या प्रश्नात परिवर्तनाच्या दृष्टीने प्रतिसाद देते, हेच यातून दिसून येते, असे याविषयीच्या लेखात नमूद करण्यात आले आहे. चीन, रशियाकडून अशी अपेक्षा करता येणार नाही. भारतात विलंबाने कारवाई केली जाते, असा आरोप केला जातो, परंतु या प्रकरणातून भारतातील राजकीय व्यवस्थेचे चित्र समोर आले आहे, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

56 दिवसांत कायदा
नवी दिल्लीत तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यावर तातडीने निर्णय घेत कायद्यात सुधारणा केली. ही प्रक्रिया केवळ 56 दिवसांत पूर्ण करण्यात आल्याबद्दल वॉशिंग्टन पोस्टने भारतातील राजकीय नेतृत्वाचे कौतुक केले आहे.


अमेरिकेलाही मागे टाकले
अग्रलेखात अमेरिकेची तुलना भारतासोबत करण्यात आली आहे आणि भारत अधिक चांगला असल्याचे म्हटले आहे. दिल्ली बलात्काराच्या दोन दिवस आधी अमेरिकेत सँडीहूक शाळेत गोळीबाराची घटना घडली होती.बलात्काराच्या घटनेनंतर भारताने कायद्यात बदल करून तो लागूही केला, तर अमेरिकेत मात्र अद्यापही बंदूक नियंत्रण कायद्याबाबत खल सुरू आहे.