आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Parliament Supports Government Over Prism Spying Program

हेरगिरी चालूच ठेवा, अमेरिकी संसदेचा सरकारला पाठिंबा; मतदानातून कौल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- नागरिकांच्या आयुष्यात लुडबूड करणार्‍या निगराणीच्या गुप्त कार्यक्रमावरून वाद सुरू असतानाच गुरुवारी अमेरिकेच्या संसदेने सरकारची पाठराखण केली. दहशतवादावर नियंत्रण ठेवण्याच्या नावाखाली हेरगिरीचा कार्यक्रम चालूच ठेवा, असा ठराव करण्यात आल्याने लाखो नागरिकांवर पुन्हा हवालदिल होण्याची वेळ आली आहे.

अमेरिकेच्या संसदेत लोकप्रतिनिधी सभागृहात हा मुद्दा प्रचंड गाजला. त्यावर मतदान घेण्यात आले. त्यात 217 विरुद्ध 205 मतांनी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. स्नोडेन प्रकरणानंतर पहिल्यांदाच देशातील लोकप्रतिनिधींना आपली बाजू मांडण्याची संधी सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. बुधवारी रात्री त्यावर मतदान झाले. सरकारने एनएसएचे अनुदान बंद करावे. त्यामुळे एनएसए फोनची माहिती ठेवू शकणार नाही, असा प्रस्ताव विरोधी प्रतिनिधीकडून मांडला होता. त्याला पाठिंबा मिळाला नाही. त्यानंतर सभागृहाने संरक्षण विधेयकावर मतदान घेतले. नागरिकांच्या निगराणीवरून पहिल्यांदाच राजकीय एकीचे दर्शन या वेळी पाहायला मिळाले.

कोणाचा विरोध ?
देशात रोष असतानाच रिपब्लिकनचे जस्टिन अमाश यांनी सरकारच्या गुप्त कार्यक्रमाला आव्हान दिले होते. देशातील नागरिकांच्या दूरध्वनी संभाषणाचा मोठ्या प्रमाणात संग्रह करण्यात आलेला आहे. सरकारची कृती चुकीची असून यातून अमेरिकी नागरिकाच्या खासगी आयुष्याला धोका निर्माण झाला आहे, असे अमाश यांनी म्हटले आहे. सभागृहातील पराभवानंतर ट्विटरवर त्यांनी लढाई सुरूच राहील, असे स्पष्ट केले.

12 वर्षांपूर्वीचे विसरू नका !
देशाने बारा वर्षांपूर्वी 11 सप्टेंबरला जे अनुभवले ते विसरून कसे चालेल? त्या कटू आठवणी तशाच ताज्या आहेत. म्हणूनच सर्व सदस्यांनी सरकारच्या निगराणीच्या कार्यक्रमाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन रिपब्लिकनचे हेरगिरी समितीचे अध्यक्ष माइक रॉजर्स यांनी केले होते.

संदेशांचा पाऊस
सभागृहात हेरगिरीसंबंधी चर्चा व मतदान सुरू असतानाच्या तासाभरात देशभरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात संदेश पाठवले जात होते. त्यात पत्र, ट्विटचा अधिक समावेश होता. त्यात काही नागरिकांनी सरकारच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली, तर काही नागरिकांनी पाठिंबा दिला.

असांजची ‘विकीलिक्स पार्टी’


मेलबर्न । विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजने ऑस्ट्रेलियात राजकीय पक्ष सुरू केला आहे. गुरुवारी त्याच्या पक्षाची औपचारिक सुरुवात झाली असून तो यंदाच्या निवडणूक रिंगणातदेखील उतरणार आहे. ‘विकीलिक्स पार्टी’ असे त्याचे नाव असून हा पक्ष ऑस्ट्रेलियात सात उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात येते. 42 वर्षीय असांज मूळचा ऑस्ट्रेलियाचा असून एक वर्षापासून तो लंडनच्या एक्वाडोरियन राजदूत कार्यालयात आहे. जून 2012 पासून तो राजदूत कार्यालयातून बाहेर पडलेला नाही. ब्रिटनकडून स्वीडनला प्रत्यार्पण करण्याच्या विरोधात त्याने कायदेशीर लढाई सुरू केली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात त्याच्यावर स्वीडनमध्ये खटला सुरू आहे.