आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल-कायदाच्या धमकीने अमेरिकेत घबराट, नागरिकांसाठी अलर्ट जारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अल-कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेत हल्ले करण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिकी प्रशासनाची भीतीने गाळण उडाली आहे. रविवारी विमानतळ, रेल्वेस्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधीही सरकारकडून नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 22 दूतावासांचे कामकाजही तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आले आहे.


दहशतवाद्यांकडून आलेल्या धमकीनंतरच्या परिस्थितीवर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बारकाईने नजर ठेवून आहेत. गेल्या आठवड्यात ओबामा यांना अशा प्रकारची माहिती मिळू लागली आहे. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिका-यांशी सल्लामसलत केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुझान राइस यांच्या अध्यक्षतेखालीदेखील सुरक्षा अधिका-यांची बैठक झाली. त्यावरून सरकार पुरते हादरले असल्याचे दिसून येते. याच आठवड्याच्या सुरुवातील ओबामा यांनी उपाययोजना करा. हल्ल्याचे स्वरूप काय असू शकते याची माहिती घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रविवारी अमेरिकेने जगभरातील 22 राजदूत कार्यालये बंद ठेवली होती.


कडक चौकशी
अमेरिकेच्या गृहखात्याने सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. विमानतळ, रेल्वेस्थानक, वाहतुकीच्या इतर ठिकाणांवर रविवारी कडक तपासणी करण्यात येत होती. परदेशातून अमेरिकेत दाखल झालेल्या प्रवाशांची कडक झडती घेतली जात होती.


आखाती देशांत प्रवास टाळा
आखाती देशांतील प्रवास टाळण्याचे आवाहन अमेरिकेने आपल्या नागरिकांना केले आहे. मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील देशांतील प्रवास करू नये, अशी सूचना सरकारने केली आहे. त्यासाठी शुक्रवारी इशारा जारी करण्यात आला होता.


हे दूतावास बंद
अमेरिकेने रमजानच्या काळात अल-कायदाने कोणत्याही प्रकारचा हिंसाचार घडवून आणू नये म्हणून विविध देशांतील आपल्या दूतावासांना तात्पुरत्या स्वरूपात बंद केले आहे. त्यात अबुधाबी, अल्जेरिया, ओमान (जॉर्डन), बगदाद, कैरो, धाहारन, दिजबोटी, ढाका, दोहा, दुबई, अर्बिल, जेद्दाह, काबूल, खार्टाम (सुदान), कुवेत सिटी, मनामा, मस्कत, नॉकाचोट, रियाध, सना,
त्रिपोली या मुस्लिम राष्ट्रांतील राजदूत कार्यालयांचा समावेश आहे.