आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या हेरगिरीवर टाच, दहा वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेचे विधेयक सिनेटमध्ये संमत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - लक्षावधी लोकांच्या खासगी फोन संभाषणात नाक खुपसून पाळत ठेवण्याच्या उद्योगामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेची (एनएसए) लयाला गेलेली सार्वजनिक विश्वासार्हता परत मिळवून कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी अमेरिकी सिनेटच्या एका महत्त्वाच्या समितीने एनएसएच्या हेरगिरीवर बंधने लादणा-या विधेयकाला मंजुरी दिली आहे.


एनएसएच्या बेसुमार हेरगिरीवर नियंत्रण लादणा-या परदेशी हेरगिरी सुधारणा विधेयकाला (एफआयएसए) अमेरिकी सिनेटच्या हेरगिरीविषयक निवड समितीने 11 विरुद्ध 4 मतांनी मंजुरी दिली. या कायद्यामध्ये अमेरिकेच्या देशभक्ती अधिनियमातील तरतुदींनुसार मोठ्या प्रमाणावर संभाषणाचा तपशील गोळा करण्यावर कडक नियंत्रणे लादण्यात आली आहेत. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी प्रतिनिधी सभागृह आणि सिनेटची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

आमच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एनएसएचा कॉल-रेकॉर्ड कार्यक्रम कायदेशीर असून तो व्यापक न्यायालयीन व काँग्रेसस्तरावर पुनर्विलोकनाच्या अधीन आहे; परंतु गोपनीयतेच्या सुरक्षेसाठी सार्वनिक पाठिंबा व पारदर्शकता वाढवण्याची आवश्यकता आहे, असे सिनेटच्या हेरगिरीविषयक निवड समितीच्या अध्यक्षा डायनी फेइन्स्टेइन यांनी म्हटले आहे.

आमची राष्ट्रीय व आर्थिक सुरक्षा आणि जगभरातील आमचे मित्र आणि सहकारी राष्ट्रांवरील हल्ले थांबवण्यासाठी हेरगिरी आवश्यक आहे; परंतु त्यात पारदर्शकता आणि सार्वजनिक पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे. सिनेटने त्याच दिशेने पाऊल उचलले आहे, असे सिनेटच्या निवड समितीच्या अध्यक्षा डायनी फेइन्स्टेइन म्हणाल्या.


नव्या कायद्यातील तरतुदी
० एनएसएला परदेशातून बिगर अमेरिकी नागरिकांचा डाटा गोळा करायचा असल्यास अ‍ॅटर्नी जनरलनी मंजुरी दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल आणि त्याला एनएसएच्या संचालक आणि महानिरीक्षकांना सिनेटची मंजुरी घ्यावी लागेल.
० परदेशातून फोन संभाषणाचा डाटा बेकायदा गोळा केल्याचे सिद्ध झाल्यास दहा वर्षे तुरुंगवास.
० फोन संभाषणाचा डाटा गोळा करणे आवश्यक आहे. याचे एफआयएसए न्यायालयात पुनर्विलोकन झाल्यानंतर बिगर अमेरिकी नागरिकांच्या फोन संभाषणाचा डाटा परदेशातून गोळा करता येईल.

अतिरेक झाला हे मान्यच : केरी
एनएसएच्या हेरगिरीवर जगभरातून टीकेची झोड उठवली जात असतानाच काही प्रकरणांमध्ये एनएसएने मर्यादा ओलांडून अतिरेक केल्याची अनपेक्षित कबुली अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी दिली आहे. मात्र, या कार्यक्रमांतर्गत निष्पाप लोकांशी ‘दुर्व्यवहार’ करण्यात आला नसल्याचे म्हटले आहे.

जर्मनीला मदतीची स्नोडेनची तयारी
बर्लिन । जर्मनीच्या चान्सलर अंगेला मर्केल यांच्या मोबाइल फोनची अमेरिकेने केलेल्या बेकायदेशीर हेरगिरी प्रकरणाच्या तपासात मदत करण्याची तयारी एनएसएचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेनने दाखवली आहे. जर्मनीच्या ग्रीन पार्टीच्या खासदार आणि जर्मनीच्या हेरगिरीविषयक संसदीय नियंत्रण समितीच्या सदस्या हॅन्स ख्रिस्टिन स्ट्रोएबेल यांनी स्नोडेनची रशियात गोपनीय भेट घेतली.