अरब लीगचे निरीक्षक / अरब लीगचे निरीक्षक सिरियात

वृत्तसंस्था

Dec 28,2011 02:58:04 AM IST

दमास्कस - असाद सरकारच्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर सिरियात आज अरब लीगच्या निरीक्षकांचे आगमन झाले. निरीक्षकांचे आगमन होण्याच्या काही तास अगोदर सरकारने राजधानीसह विविध शहरांमधून लष्कर हटवले. दरम्यान, असाद राजवटीविरोधात होम्स शहरात आज जोरदार निदर्शने करण्यात आली.
राष्ट्राध्यक्ष डॉ. बशर अल असाद यांच्याविरोधात गेल्या मार्च महिन्यात आंदोलन सुरू झाल्यानंतर आजतागायत पाच हजार बळी गेल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.सिरियातील हिंसाचार संपविण्यासाठी अरब लीगने पुढाकार घेतला असून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लीगचे पथक आज सिरियात दाखल झाले.अरब लीगच्या शांतता मोहिमेनुसार सर्व शहरांमधून लष्कर मागे घेण्यात येऊन सर्व कैद्यांचीही सुटका करण्यात यावी अशा अटी आहेत. त्यानुसार आंतरराष्ट्रीय आणि अरब वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना देशात पाहणी करण्याची परवानगीही असाद सरकारने दिली आहे.
दरम्यान, पथक दाखल होण्यापूर्वी सोमवारी होम्स शहरात लष्कराने 30 जणांचे बळी घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. परंतु रातोरात गोळीबार थांबला असून मंगळवारी पहाटे रणगाडे अचानक हटवण्यात आले. बाबा अम्र येथे 18 तर होम्स शहर व आसापास 11 बळींचा यात समावेश आहे. लंडनस्थित सिरियाच्या मानवी हक्क निरीक्षकांनी सांगितले की, अनेक ठिकाणी सरकारी इमारतींच्या आडोशाला रणगाडे लपवण्यात आले आहेत. होम्स मध्ये आज 30 हजार लोकांनी असाद यांच्या दडपशाहीविरोधात उग्र निदर्शने केल्याचे मानवी हक्क निरीक्षकांनी सांगितले.सिरियातील खासगी टीव्ही चॅनेल अल-दुनियाने अरब लीगचे निरीक्षक होम्सच्या गव्हर्नरला भेटले असल्याचे वृत्त दिले आहे.
सुदानचे जनरल मुस्तफा दबाई यांच्या नेतृत्वाखालील अरब लीगचे पथक सिरियात आले असून असाद सरकारकडून तपासणीसाठी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अरब लीगच्या पथकाला देशभरात कुठल्याही ठिकाणी फिरण्याची मुभा सिरियन सरकारने देऊ केली आहे. परंतु सरकारी गाड्या आणि सुरक्षा दलासमवेत ते पाहणी करीत आहेत. परंतु अरब लीगच्या पथकाची अवस्था कैद्यांप्रमाणे असल्याची टीका असाद यांचे विरोधक सिरियन राष्ट्रीय परिषदेच्या नेत्यांनी केली आहे.
दरम्यान, अनेक सशस्त्र टोळ्यांविरुद्ध आमची लढाई सुरू असून लष्कराचे हजारो जवान मारले गेले असल्याचा दावा सिरियन सरकारने केला आहे.गेल्या काही आठवड्यांपासून अनेक जवान असाद सरकारविरोधात गेले असून त्यांनी लष्करावर हल्ले चढवले आहेत.

X
COMMENT